नवी मुंबई : मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. करोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू करण्यात आली होती. मोठ्या रक्कमेची थकबाकी असणा-यांवार पालिकेने कर वसुलीसाठी लक्ष केंद्रित केले. बेलापुर ते वाशी विभागात थकबाकीदारांवर जप्ती, लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात येत असून १५ मार्चपर्यंत पालिकेने विविध समाज माध्यमांद्वारे थकबाकीदारांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.
थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी ठराविक दिवसांची मुदत देण्यात आलेली असून तरीही रक्कम न भरल्यास मालमत्ता अटकावणी करून जप्ती, लिलाव पर्यंतची धडक कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे ५७५ कोटीचे लक्ष ठेवले असून आजपर्यंत ४५० कोटी वसूल झाली आहेत व महिना अखेर मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी पालिका जोरदार प्रयत्न करत आहे.
मालमत्ताकर भरणे हे प्रत्येक मालमत्ताकर धारकाचे कर्तव्य असून याव्दारे जमा होणा-या महसूलातूनच नागरी सुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने मालमत्ताकर थकबाकीदारांनी कायदेशीर कारवाईची कटू वेळ येऊ न देता आपली मालमत्ताकराची थकबाकी तसेच नियमित मालमत्ताकर त्वरीत भरणा करावी.