नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असणाऱ्या मालमत्ता कर विभागात नोंदल्या जाणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करणारी महत्वाची प्रणाली मागील महिनाभरापासून ठप्प झाली आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सत्रातच या महत्वाच्या विभागाचे कामकाज थांबले आहे. नव्याने खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करणे, सिडकोकडून वितरीत झालेल्या मोकळ्या भूखंडांना कर आकारणी करणे तसेच मालमत्तांची हस्तांतरणाची सर्व कामे या काळात बंद झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाला घरघर लागलीच आहे, शिवाय मूल्यांकनाची प्रक्रिया रखडल्याने बिलांचा भरणा करणे शक्य होत नसल्याने नवी मुंबईकर करदातेही या विभागाच्या नावे खडे फोडू लागले आहेत.

मालमत्ता कर हा नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. नवी मुंबई महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ९०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य समोर ठेवले होते. जानेवारी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या विभागाकडे ६२५ कोटी रुपये जमा झाले आहेत. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यांत ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर रक्कम गोळा होईल असे दावेही केले जात आहेत. महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी नव्या वर्षात अर्थसंकल्प मांडत असताना ९०० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य गाठले जाईल असा दावा केलाच, शिवाय पुढील वर्षात १२०० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्यही समोर ठेवत असल्याचे जाहीर केले.

नवी मुंबईत मोठया प्रमाणावर बेकायदा बांधकामे आहेत. सिडकोच्या अल्प उत्पन्न गटाच्या वसाहतींमध्ये वाढीव बांधकामांची संख्याही मोठी आहे. अशा बांधकामांना महापालिकेने दंडासह कर आकारणी केलेली नाही. लिडार सर्वेक्षणात ४५ हजार नव्या मालमत्तांचा शोध लागला असला तरी या आघाडीवरही महापालिकेने ‘आस्ते कदम’ धोरण स्विकारले आहे. असे असताना आहेच त्या मालमत्तांचे मूल्यांकनही संगणकीय प्रणालीतील संथगतीमुळे रखडल्याने या विभागाचे कर्मचारी सध्या हातावर हात ठेवून बसल्याचे अजब चित्र पहायला मिळत आहे.

कर वसुलीला वेग आणण्याच्या दिवसात ही प्रक्रिया ठप्प असल्याने या विभागातील अधिकारी आणि कर्मचारीही अस्वस्थ झाले आहे. या विभागाकडून वारंवार पाठपुरावा करुनही बिले मिळत नाहीत तसेच मालमत्तांचे हस्तांतरणही होत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप आहे. कर भरणा शक्य नसल्याने अनेकदा मालमत्ता व्यवहारांसाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत’ दाखला मिळविण्यातही ग्राहकांना अडचण येत आहे.

ॲानलाइन कारभाराच्या नावाने गोंधळ

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचा कारभार ॲानलाइन पद्धतीने चालावा आणि मालमत्तांचे मूल्यांकन तसेच कर आकारणी वेगाने व्हावी यासाठी या विभागाची स्वतंत्र्य अशी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मालमत्ता कर विभागाची या प्रणालीचे काम यापूर्वी मार्स टेलिकॅाम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पाहिले जात होते. काही महिन्यांपूर्वी हे काम प्रोबीटी साॅप्टवेअर प्रायव्हेट लि. या कंपनीकडे सोपविण्यात आल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

मालमत्ता कर विभागासाठी आर्थिक वर्षाचे अखेरचे महिने महत्वाचे असतात. मालमत्ता कराची बिले वर्षातून दोनवेळा निघत असतात. असे असले तरी ठाणे-बेलापूर तसेच इतर अैाद्योगिक कंपन्यांच्या बाबतीत हे गणित जसेच्या तसे लागू होत नाही. ठाणे-बेलापूर अैाद्योगिक पट्टयात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांना मालमत्ता कराची बिले जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात हवी असतात. या बिलांचा भरणा करताना या कंपन्यांना आर्थिक मंजुऱ्यांची प्रक्रिया राबवावी लागते.याशिवाय सिडकोने नुकतेच विक्रीस काढलेले भूखंड, नव्याने नोंदीत झालेल्या मालमत्ता, त्यांचे हस्तांतरण यासारखी प्रक्रियाही सातत्याने सुरु असते. असे असताना या विभागातील संगणकीय प्रणाली महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यात कोणतीच तांत्रिक अडचण नाही. नागरिकांना काही अडचण येत असल्यास याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल. शरद पवार, उपायुक्त, प्रशासन व मालमत्ता विभाग.

Story img Loader