लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : शिवडी -न्हावासेवा सागरी सेतू अर्थात ‘अटलसेतू’च्या कामासाठी तोडण्यात आलेल्या खारफुटी, पाणथळ जागा आणि गाळ पुनर्संचयित करण्याची विनंती पर्यावरणतज्ज्ञांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
‘एमएमआरडीए’ने पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालात ४० हेक्टरपेक्षा जास्त जागेवर ‘कास्टिंग यार्ड’सारख्या तात्पुरत्या संरचना बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. ‘कास्टिंग यार्ड’साठी नवी मुंबईतील उलवे-गव्हाण येथील १६ हेक्टर खारफुटीसह १९ हेक्टर जमिनीचे सपाटीकरण करण्यात आल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. किनारपट्टी भागात आढळणारी खारफुटी ही पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची आहे. तिच्या पुनर्संचयनामुळे केवळ आपला पर्यावरणीय वारसाच नाही तर स्थानिक मासेमारी समुदायाच्या जीवनावश्यकतेचीही पूर्तता होईल. त्यामुळे किनारपट्टी भाग संवर्धन आणि संरक्षणाच्यादृष्टीने कांदळवन कक्षाकडे सुपूर्द करावेत अशी मागणी पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : कोपरखैरणेत अतिक्रमणांवर कारवाई
खारफुटी हा पर्यावरणदृष्ट्या एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे संवर्धन करण्याची सध्या गरज आहे. त्याबाबत आम्ही पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष बी. एन. कुमार यांनी सांगितले.