उरण: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार दिबा पाटील यांचे नाव देण्यात सरकार दिरंगाई करीत आहे. याविरोधात १३ जानेवारी या दिबांच्या जन्मदिनी प्रकल्पग्रस्त ९५ गावांतील वारकरी भजन कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनात पाच हजारांहून अधिक वारकरी आणि नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे आंदोलन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशव्दारावरच करण्यात येणार आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांना ह्यह्णदेता की जाताह्णह्ण असा इशाराही देण्यात येणार आहे. तसेच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीआधीच नामकरणाचा निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यास विमानतळाचे काम बंद करण्याचा इरादाही खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी माहिती देताना सांगितले.
हेही वाचा…
विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी मागील तीन वर्षांपासून मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांतील स्थानिक भूमिपुत्र आंदोलने करीत आहेत. याची नोंद घेत राज्य सरकारने केंद्राकडे नावाचा प्रस्ताव दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.
९५ गावांतील वारकऱ्यांची प्रवचनातून जनजागृती
प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी फक्त राजकारण करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करीत आहेत. केंद्र व राज्याच्या या कृतीविरोधात सरकारला इशारा देण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, उरण आदी सिडको प्रकल्पग्रस्त ९५ गावांतील वारकरी, सांप्रदायिक मंडळ भजन, कीर्तन, प्रवचन करून जनजागृती करणार आहेत.