पनवेल : राज्यात जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारे लघुसंदेश समाजमाध्यमांवर पसरवून दंगल सदृष्य स्थिती निर्माण केली जात असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याअंतर्गत शांतता कमिटीच्या बैठका घेण्याच्या सूचना केल्या. गुरुवारी ठरल्याप्रमाणे शांतता कमिटीमधील सदस्यांसोबत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावण्यात आले होते. परंतु या बैठकीत थेट पोलिसांच्या चिरिमिरीमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करण्यात आल्याने उपस्थित पोलीस चक्रावले.
समाजात विविध जाती धर्मांच्या नागरिकांनी सलोख्याने रहावे या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता कमिटी तसेच मोहल्ला कमिटीच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. गुरुवारी ठरल्याप्रमाणे शहरातील क्राऊन सभागृहात बैठक सुरू झाली. पोलिसांनी नागरिकांना ज्यावेळी त्यांची मते मांडण्यासाठी संधी दिली. त्यावेळेस मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारीने पोलीस दलाचे सुरुवातीला कौतुक केले. मात्र कळंबोली सर्कलला पोलीस कर्मचारी वाहने थांबवून चिरिमिरी घेत असल्याचा आरोप केला.
हेही वाचा – बुलढाणा : लोंबकळणाऱ्या तारा ठरल्या प्राणघातक; मशागत करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
उपायुक्त डहाणे यांच्यासमोर पोलिसांवर जाहीर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ होती. पोलीस अधिकारी चांगले आहेत, मात्र पोलीस कर्मचारी कारवाईचा बडगा रस्त्यावर धावणाऱ्या वाहनचालकांवर उगारतात, असा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस उपायुक्त डहाणे यांनी या बैठकीत नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे असे सांगताना समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या अफवांमुळे सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.