शौचालयांची रचना चुकीची असल्याने महिलांकडून तीव्र नाराजी

पनवेल : पनवेल शहरामधील महिलांसाठी असणारी सार्वजनिक शौचालयांचे प्रवेशद्वार थेट रस्त्यावर दिसत असल्याने अनेक महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी स्थिती आहे. शौचालयात प्रवेश करताना आणि शौचालयातून बाहेर पडणाऱ्या महिलांना रस्त्यावरील व्यक्तींचा आमनासामना होत असल्याने महिला वर्गातून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

पनवेल शहरामध्ये एकूण ३३ सार्वजनिक शौचालये तर पालिका क्षेत्रात एकूण २८८ सार्वजनिक शौचालये आहेत. यापैकी ८ शौचालये पालिकेने निष्कासित केली. पनवेल शहरातील जुन्या नगर परिषद क्षेत्रामध्ये बांधण्यात आलेली शौचालयांची रचना चुकीची असल्याबद्दल अनेक नागरिकांनी यापूर्वी आवाज काढला होता. नगर परिषद काळात ही चूक दुरुस्ती केली न गेल्याने पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांची रचना बदलावी असे महिलांचे मत आहे. पनवेल भाजी मार्केटमध्ये तुकाराम मंदिरासमोर, शिवाजी पुतळ्याशेजारी आणि टपालनाक्याकडे जाताना अशा तीन ठिकाणी असणाऱ्या शौचालयांमध्ये महिलांच्या शौचालयांचे दरवाजे थेट रस्त्यांवरील व्यक्तींना दिसतात. अशीच काहीशी दुरवस्था कोळीवाडय़ातील सार्वजनिक शौचालयांची आहे. पनवेल पालिका मुख्यालयातील अधिकारी शौचालयांच्या बांधकामांच्या रचनेविषयी चिंता व्यक्त करत असून त्यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन देत आहेत. परंतु पनवेल पालिकेच्या सभागृहामध्ये एकदाही चुकीच्या बांधकाम रचना असलेल्या सार्वजनिक शौचालयांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आलेला नाही. शौचालयांमधील अस्वच्छता यावर सभागृहात महिला सदस्यांनी आवाज उचलला आहे. शौचालयांचे प्रवेशद्वार इतपत शौचालयांच्या दुरवस्थेचा प्रश्न नसून अनेक शौचालयांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य आहे. तसेच अनेक शौचालयांची खिडक्या तुटलेल्या आहेत. पनवेल पालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये ई टॉयलेट (शौचालय) आहेत. स्वयंचलित शौचालयांमध्ये दोन रुपयांच्या नाण्यामध्ये या शौचालयांचा लाभ घेता येतो. दीडशे वर्षांची नगर परिषदेच्या हद्दीतील पनवेल शहरातील शौचालये मात्र आजही मरणपंथाला आली आहेत. शौचालये त्यांचे जुनेपण कधी सोडणार हा प्रश्न आहे.

सिक्कीमप्रमाणे शौचालये असावीत

देशात सर्वाधिक सुसज्ज सार्वजनिक शौचालये सिक्कीम या राज्यात आहेत. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीची घोषणा होण्यापूर्वी सिक्कीममध्ये सर्वात पहिल्यांदा प्लास्टिकबंदी यशस्वीरीत्या पार पडली. या राज्यात काही मीटर अंतरावर स्वच्छ व आधुनिक पद्धतीची शौचालये दिसतील. सिक्कीमप्रमाणे पनवेलमधील परिस्थिती कधी बदलेल हा प्रश्न आहे.

पनवेल शहरातील दुरुस्तीची आवश्यकता असणाऱ्या शौचालयांचे काम हाती घेण्यात आले आहे.

– गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका