२५०० स्थानिक कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती; रक्त चंदन चोरीला गेल्याने सीमा शुल्क विभागाची कारवाई
उरणमधील जेएनपीटी बंदरावर आधारित आयात-निर्यातीच्या मालाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची उभारणी करण्यात आलेली असून या गोदामामुळे येथील स्थानिकांना हजारो रोजगार उपलब्ध झाले आहेत; मात्र उरणच्या द्रोणागिरी नोडमधील सीडब्ल्यूसीचे गोदाम दोन वर्षांपूर्वी बंद झाल्याने त्यातील एक हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. तर काही दिवसांपासून पंजाब कॉनवेअर या गोदामातून रक्त चंदनाचा कंटेनर चोरीला गेल्याने सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमुळे २५०० कामगारांचा रोजगार असलेले गोदामही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येथील स्थानिकांच्या रोजगाराला घरघर लागली आहे.
एकीकडे मुंबईत जागतिक पातळीवरील उद्योगांची निर्मिती होऊन रोजगार निर्माण करण्यासाठी मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राची सुरुवात झाली आहे.असे असतांना पंचवीस वर्षांपूर्वी आलेल्या जेएनपीटी बंदरामुळे बंदरावर आधारित उद्योगात हजारो रोजगार निर्माण झाले आहेत.
६४ पेक्षा अधिक गोदामांची संख्या त्यामुळे झाली असून उरण-पनवेल परिसरातील लाखोंच्या संख्येने या गोदामावर आधारित उद्योगात कामगार काम करीत आहेत. याचा फायदा येथील स्थानिकांना झाला आहे. दोन वर्षांपूर्वी सीडब्ल्यूसी या केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या गोदामातील ३७५ कामगारांना गोदाम बंद पडल्याने पंचवीस वर्षे नोकरीत असलेल्या या कामगारांना रोजगाराला मुकावे लागले आहे.तर त्यांच्या साथीने रोजगार करणाऱ्या एक हजारपेक्षा अधिक रोजगारांवरही गदा आली आहे. केंद्रीय मंत्र्याच्या अनेक आश्वासनानंतर आजही हे गोदाम बंदच आहे. द्रोणागिरी नोडमधील या गोदामाशेजारी असलेले पंजाब कॉनवेअर हे गोदामही आता तस्करीच्या रक्तचंदनाचा कंटेनर चोरीला गेल्याने संकटात आले आहे. सीमा शुल्क विभागाने या गोदामातील माल साठवणुकीला २६ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिल्याची माहिती गोदामाचे व्यवस्थापक थॉमस जेकब यांनी दिली आहे.यात गोदाम व्यवस्थापनाला आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलेले आहे.याचा परिणाम येथील व्यवसायावर झाला आहे.त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.