नवी मुंबई– राज ठाकरे यांनी आज नवी मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी वाशी येथे संवाद साधला. मनसे अध्यक्ष आज नवी मुंबईत येणार म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी वातावरण मनसेमय केले होते. या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांना संघटना कशी वाढवावी, लोकांशी कसा संपर्क साधावा याचा कानमंत्र देतानाच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता म्हणून प्रथम काम करा, आपापले हेवेदावे बाजूला ठेवा व पक्षवाढीसाठी प्रयत्न करा, असा सज्जड दम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१७ जूनपर्यंत पदाधिकाऱ्यांनी आपले आत्मपरीक्षण करून पक्षाच्या कामासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निरोपाची किंवा संपर्काची वाट बघू नका तर पक्ष म्हणून मनापासून काम करण्याचा आदेश दिला. १७ जूनला याबाबत पुन्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर नवी मुंबईत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह कला, क्रीडा, सामाजिक कार्य, हॉटेल व्यवसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांशीही ठाकरे यांनी संवाद साधला. या वेळी मनसेच्या संघटनात्मक दौऱ्यांसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष संघटनात्मक कामात पदाधिकाऱ्यांशी चर्चेद्वारे आवश्यक ते बदल करण्याचे व पक्षवाढीसाठी संघटनात्मक पद्धतीने एकजुटीने काम करण्याचे मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.