नवी मुंबईतील अन्य अनेक प्रकल्पांप्रमाणेच शहरातील आपत्ती व्यवस्थापनही सक्षम होऊ शकते आणि इतर शहरांसाठी आदर्श ठरू शकते. त्यासाठी पावसाळ्यात कोसळणारी झाडे, खड्डेमय रस्ते, नालेसफाईतील विलंब अशा त्रुटींवर मात करायला हवी. पालिकेच्या विविध विभागांत समन्वय ठेवायला हवा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जूनच्या पहिल्या आठवडय़ात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे. संततधार पाऊस आतापर्यंत पडलेला नाही, मात्र पहिल्याच पावसात शहर आपत्ती व्यवस्थापनाची चुणूक दिसून येते. नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध शहर आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवली, पनवेलसारखी परिस्थिती येथे नाही. ही स्थिती अलीकडे सुधारली आहे. यापूर्वी नवी मुंबईतील अनेक उंचसखल भागांतील रहिवाशांना पावसाळ्यात सुखरूप बाहेर काढण्यासाठी होडय़ांचा वापर करावा लागत असे. नवी मुंबई पालिकेने मागील २५ वर्षांत टप्प्याटप्प्याने येथील शहर व्यवस्थापनात सुधारणा केल्या. २६ जुलैच्या प्रलयानंतर हे आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम आणि वेगवान करण्याचा प्रयत्न पालिकेने केला. सध्या पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. हे येथील सर्व प्राधिकरणांच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी मागील महिन्यात आपत्ती व्यवस्थापनाचा एका आराखडा तयार केला असून समन्वयावर भर देण्यास सांगितले आहे.

आपत्ती ही सांगून येत नसल्याने सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. यासाठी एक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याशिवाय सर्व अग्शिमन केंद्रांत व विभाग कार्यालयांत अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

दरवर्षी पालिका क्षेत्रांत शेकडो झाडे पडत असताना पावसाळ्यापूर्वी वृक्षांची छाटणी का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवी मुंबई डोंगर आणि खाडी यांच्यामधील भूभागावर वसलेली आहे. त्यामुळे डोंगरातून निघणारे पावसाळ्यातील पाणी थेट खाडीकडे जाण्यासाठी वाट शोधत असते. त्यामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे झरे दिसून येतात. हे पाणी योग्य मार्गाने खाडीकडे जावे यासाठी सिडकोने १७ मध्यवर्ती नाल्यांची रचना केली आहे. हे नाले आठ महिन्यांत डेब्रिज, गाळाने भरतात. ते वेळीच साफ करण्याची आवश्यकता असते. अनेक कंत्राटदार थातूरमातूर साफसफाई करून पैसे वसूल करण्याच्या मागे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाडीत भरती आली की या नाल्यांनाही भरती येते. संततधार पाऊस पडल्यास या नाल्यांतील पाणी आजूबाजूच्या शहरी भागांत घुसण्यास वेळ लागत नाही.

याशिवाय पालिकेची सर्व गटारे २५ मेपर्यंत साफ करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, पण हे काम जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे गटारांतून बाहेर काढून सुकण्यासाठी ठेवलेला गाळ पहिल्या पावसात पुन्हा गटारात गेल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

पालिकेने एमआयडीसी भागातील मध्यवर्ती रस्त्यांना मुलामा चढवल्याने सर्वत्र चकाचक दिसते, पण अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. उद्योजकांनी येथे उद्योग न करता पळ काढावा, अशीच ही स्थिती आहे. हे रस्ते दुरुस्त करायचे कोणी या वादात गेली २० वर्षे उद्योजक गैरसोयींच्या गर्तेत अडकले आहेत. हे रस्ते आम्ही दुरुस्त करणार नाही आणि त्यांची पुनर्बाधणीही करणार नाही, ते एमआयडीसीने बांधावेत असा पवित्रा पालिकेने घेतला आहे. त्यामुळे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. एमआयडीसीने आता कुठे काही रस्त्याची पुनर्बाधणी हाती घेतली आहे, पण त्यामुळे संपूर्ण एमआयडीसीचे चित्र बदललेले नाही. सिडकोने बांधलेल्या काही भुयारी मार्गाची पावसाळ्यात तळी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळ ऐरोली, कोपरखैरणे, वाशी येथील भुयारी मार्गात या काळात वाहने हाकणे जिकिरीचे आहे. नवी मुंबई एक बारा ते चौदा लाखांचे छोटे शहर आहे. येथे आपत्ती व्यवस्थापन करणे तसे सोपे आहे. काही त्रुटींवर पालिका आणि इतर प्राधिकरणांनी समन्वयाने मात केल्यास शहरातील अन्य अनेक प्रकल्पांप्रमाणेच आपत्ती व्यवस्थापनही इतरांसाठी आदर्श ठरू शकते.

१५० वृक्षांची पडझड

नवी मुंबईत पहिल्याच मुसळधार पावसात शहरात १५० पेक्षा जास्त वृक्ष कोसळल्यानंतर मदतीचे हात लवकर घटनास्थळी पोहोचू शकले. वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. नवी मुंबईतील झाडांची मुळे खोलवर रुजलेली नाहीत. त्यामुळे ती कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात जास्त घडतात. ही दरवर्षीची आपत्ती आहे, पण पालिका यावर कायमस्वरूपी उपाययोजना करत नाही. शहरात साडेआठ लाखांपेक्षा जास्त वृक्ष असून यात सुबाभळीची सर्वाधिक झाडे आहेत. ही झाडे पदपथ आणि रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आली आहेत. त्यामुळे ती पडतात तेव्हा अनेक वाहनांचे नुकसान होते. नैसर्गिक आपत्ती असल्याने वाहनमालकांना भरपाई मिळण्यास देखील अडचणी येतात.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quality disaster management cell in navi mumbai
Show comments