खारघर, नैना आणि विशेष आर्थिक क्षेत्रावर सिडकोची हरकत
विद्यमान नगर परिषद, नैना क्षेत्रातील ३६ गावे, सिडकोचे सात नोड आणि विशेष आर्थिक क्षेत्रातील काही गावांचा अंतर्भाव करून तयार केलेल्या पनवेल महापालिकेच्या प्रस्तावित कार्यक्षेत्रावर सिडकोने आक्षेप घेतला आहे. याबाबतची हरकत सोमवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदविण्यात आली. राज्य शासनाची उपकंपनी असलेल्या सिडकोच्या सूचनेनुसार हे क्षेत्रफळ वगळल्यास पनवेल महानगरपालिका स्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पनवेल महानगरपालिका स्थापण्याच्या दृष्टीने शासनाने मागील आठवडय़ात अधिसूचना जारी केली. १७ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या विविध संस्था, पक्ष, नागरिक सूचना आणि हरकती कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदवीत आहेत. पनवेल महानगरपालिकेतील अर्धा भाग हा सिडकोच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी खारघर आणि पुष्पकनगर हा भाग वगळून पनवेल महानगरपालिका तयार करावी, असे माजी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांना सिडकोने कळविले होते. नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार पनवेल महानगरपालिकेत सिडकोचे खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा पाचनंद आणि नावडे हे विकसित आणि अविकसित नोड, नैना क्षेत्रातील ३६ गावे आणि नवी मुंंबई एसईझेड क्षेत्र आणि सिडको क्षेत्रातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना एक पत्र देऊन ही क्षेत्रे वगळण्यात यावीत, अशी सूचना मांडली आहे. सिडको नोडमधील विशेषत: खारघर क्षेत्र, नैना आणि एसईझेड ही सर्व क्षेत्रे विकसनशील असून सिडको व नवी मुंबई एसईझेड कंपनीला या भागांचा अद्याप विकास करावयाचा आहे. सिडकोच्या या भागात मेट्रो, बीकेसीसारखे वाणिज्य संकुल, ५५ हजार गृहनिर्मिती करण्याचा मानस आहे. याशिवाय अनेक भूखंडांची विक्री या भागात शिल्लक आहे. असे सिडकोने या पत्रात म्हटले आहे.
खारघर नोडचे दोन हजार, एसईझेडचे साडेचार हजार हेक्टर व ‘नैना’तील ३६ गावांचे क्षेत्रफळ वगळल्यास पनवेल महापालिकेचे क्षेत्रफळ व लोकसंख्या कमी होईल. एकूण क्षेत्रफळ १७ हजार हेक्टरपैकी सिडकोने जवळपास नऊ हजार हेक्टर क्षेत्रफळ कमी करण्याची सूचना केली आहे.