आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची गती मंदावण्याची भीती; भूषण गगराणी यांच्या नावाची चर्चा
केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीविना नवी मुंबईत स्मार्ट सिटीची मुहूर्तमेढ रोवणारे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना पूर्ण देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने सिडकोत भाटियाबदलीची जोरदार चर्चा सुरू आहे.
विक्रीकर विभागात आमूलाग्र बदल घडवून उत्पन्न वाढवणाऱ्या भाटिया यांना राज्य सरकारने मोठय़ा अपेक्षेने नवी मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ टेक ऑफसाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना भाटिया यांची बदली झाल्यास या प्रकल्पांना पुन्हा खीळ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने देशात ९८ शहरांत स्मार्ट सिटी प्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी असलेल्या शहरांना भेटी देण्यासाठी केंद्र सरकारची पथके प्रत्येक शहरात जात आहेत. आर्थिक सक्षम संस्था म्हणून सिडकोला स्मार्ट सिटीत स्थान नाकारण्यात आल्याने सिडकोने स्वबळावर खारघरसह सहा उपनगरांची एक स्मार्ट सिटी तयार करण्यास सुरुवात केली आहे.
त्यासाठी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी निकषाबरोबरच सिडकोने त्यात आपले निकष वापरले आहेत. त्याचे सादरीकरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्यात आले असून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला याची माहिती दिली आहे. या नगरांसाठी यापूर्वी खर्च करण्यात येणारा निधी व स्मार्ट सुविधांसाठी लागणारा निधी असा ५० हजार कोटी खर्च करणार असल्याचे सिडकोने जाहीर केले आहे. त्यामुळे भाटिया यांच्या या स्मार्ट संकल्पनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाची नजर गेली असून त्यांना देशातील सर्व स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्याचा विचार सुरू झाला आहे.
विक्रीकर विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर कारभार हाकणाऱ्या भाटिया यांना केवळ आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोत राहाणे पसंत आहे. हे आव्हानात्मक काम अंतिम टप्प्यात आले असतानाच भाटिया यांनी नैना व स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले असून यानंतर सिडकोचा कारभार कसा असावा यासाठी एक स्मार्ट कार्यपद्धत तयार केली आहे. त्यामुळे भाटियांना दिल्लीचे आवतण आले आहे. भाटिया यांनाही आता दिल्लीत काम करण्याची इच्छा आहे.
असीम गुप्ता यांचेही नाव
भाटिया यांच्या जागी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी व ठाण्याचे माजी आयुक्त असिम गुप्ता यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाची सर्वस्वी जबाबदारी गगराणी यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना लागलीच याची जबाबदारी देण्यात येणार नाही. याशिवाय सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनाही ही जबाबदारी मिळण्याची शक्यता असून राधा यांना सिडकोची नाडी आता चांगलीच माहीत झाली आहे.