बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीतही आधुनिक बदल होत असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी आघाडीवर असावेत यादृष्टीने आंबेडकर नगर, रबाळे येथील महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात हायवा या उद्योग समुहाच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या टॅबलॅब तसेच मनोरंजनातून शिक्षण ही अनोखी संकल्पना राबवित निर्माण करण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटी झोन अशा दोन आगळ्या वेगळ्या उपक्रमांचा शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : उद्यानात कचऱ्याचे ढीग
ॲक्टिव्हिटी झोनमध्ये सापशिडी, बुध्दीबळ, रॉक क्लायबिंग, ॲबॅकस अशा विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आलेली असून सुर्यमालेची आकर्षक प्रतिकृतीही ग्रहांच्या वैशिष्ट्यांसह साकारण्यात आलेली आहे. याव्दारे सुर्यापासून ग्रहांचे अंतर, त्यांच्या फिरण्याची गती, त्यामुळे होणारी दिवस – रात्र अशा विविध वैज्ञानिक बाबींची माहिती मुलांना हसत खेळत घेता येणार आहे. या झोनमधील प्रत्येक साहित्य व खेळ हा मुलांना विज्ञानाची माहिती देणारा व शास्त्राची गोडी वाढविणारा आहे.
हेही वाचा- पनवेल: गावच्या शेतजमिनींवर गृहनिर्मितीसाठी शेतकऱ्यांची एकजूट
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाला सुसंगत असे टॅबलॅब आणि ॲक्टिव्हिटी झोन हे दोन उपक्रम सुरु करून महानगरपालिका शाळांतील मुले स्मार्ट होतील यासाठी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक करीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रयोगशील शिक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पाठ्यपुस्तक वाचून ज्या गोष्टी लक्षात रहात नाहीत त्या पाहिल्यामुळे अधिक लक्षात राहतात. ही गोष्ट नजरेसमोर ठेवून टॅबलॅब सारखा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेची पूर्तता करेल व त्यांना स्वयंपूर्ण बनवेल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.