उरण : रेल्वे विभागाकडून रांजणपाडा स्थानकाच्या नाम फलकात बदल करण्यात आला असून आता या स्थानकावर शेमटीखार असे फलक बसविण्यात आले आहेत. स्थानकाच नाव रांजणपाडा असलं तरी तिकट मात्र शेमटीखार या नावाने मिळत होते. त्यामुळे तब्बल अकरा महिन्यांनी रेल्वेने हे नामकरण केले आहे.
वर्षभरापूर्वी उरण ते नेरुळ/ बेलापूर लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या नावात बदल करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. यातील रांजणपाडा स्थानकाच्या नामांतराचीही मागणी होती. प्रामुख्याने उरण ते नेरुळ बेलापूर मार्गावरील द्रोणागिरीचे बोकडवीरा, न्हावा शेवाचे नवघर अशी स्थानिक गावांची नावे देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. रेल्वेमार्गाच्या उद्घाटनावेळी केवळ रांजणपाडा स्थानकाच्या शेमटीखार या नावाला मंजुरी मिळाली होती. परंतु स्थानकावर आणि फलाटावर रांजणपाडा हे नाव कायम होते. या नावात दोन दिवसांपूर्वी बदल केला आहे. रांजणपाडा स्थानकाच्या फलाटावरील नावात बदल केला असला तरी स्थानकाबाहेर रांजणपाडा हेच नाव कायम आहे.
हेही वाचा…नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डम्परवर कारवाई
इतर रेल्वे स्थानकांच्या नामांतराचे काय?
उरण ते नेरुळ मार्गावरील द्रोणागिरी आणि न्हावा शेवा या स्थानकांच्या नावात बदल करण्याची मागणी आहे. ही मागणी वर्षभरात पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या स्थानकांच्या नामांतराचे काय असा सवाल आता येथील स्थानिकांकडून केला जात आहे.