नवी मुंबई : येत्या एक दोन दिवसांत मुंबई आणि परिसरात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज सकाळपासून नवी मुंबईतील हवामान ढगाळ होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात पाच ते दहा मिनिटे जोरदार सरी कोसळल्या.
पाऊस जरी पाच दहा मिनिटे पडला, तरी नौकरदार आपापल्या कामाला जायच्या वेळी बाहेर पडल्याने त्यांची त्रेधा उडाली. त्यातही काहीजणांनी छत्री आठवणीने घेतल्याचे चित्र दिसत होते.
दोनच दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर १९, २०, १ ते ४ या परिसरात हलका पाऊस पडला. मात्र येथून काही अंतरावर असलेल्या सेक्टर ८, ९, १०, ११, १२ परिसरात मात्र पावसाचा मागमूस नव्हता. आज मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. नवी मुंबईतील घणसोली ऐरोलीच्या काही भागातही थोडा पाऊस पडला. त्यात दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून हवेत प्रचंड उकाडा जाणवत असल्याने या पावसाने काहीसा गारवा जाणवत असल्याने दिलासा मिळाला आहे.