पनवेल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी कामोठे येथे पनवेल विधानसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारसभेत केले. कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा झाली. त्यावेळी आठवले बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना शिंदेगटाचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवदास कांबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रभाकर कांबळे, विजय पवार, डॉ. विजय मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीत आम्ही सर्वजण मैदानात उतरलो आहोत. रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या मागे आहे. जय भीमचा बुलंद आवाज प्रशांतजींच्या पाठीशी उभा आहे, असे आठवले म्हणाले.

हेही वाचा – पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, देश कसा पुढे घेऊन जायचा हे शिकवले. समाजापेक्षा देश मोठा असल्याचे सांगितले. देशावर जेव्हा वेळ येईल तेव्हा जात, धर्म बाजूला ठेवा असे शिकवले. आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही देशासाठी लढणारे लोक आहोत. आज बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान कोणीही बदलू शकणार नाही. राहुल गांधी खोटा प्रचार करतात, म्हणून त्यांचा निवडणुकीत तोटा होतो, असे केंद्रीयमंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – कमळ केंद्रित प्रचारावर भर, बेलापूर मतदारसंघात भाजपची खेळी; प्रचार आखणीतही मोठे बदल

खास शैलीतील कविता

यावेळी केंद्रीयमंत्री आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत कविता करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर करीत नाही काम खोटे, म्हणून त्यांना निवडून देणार आहे कामोठे, मला अनेक वेळा वाटे चौथ्यांदा प्रशांतजींना निवडून देणार आहे पनवेल आणि कामोठे अशा खुसखुशीत चारोळ्या आठवले यांनी सादर केल्या.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale talk on constitution panvel candidate prashant thakur kamothe ssb