उरण : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणी पुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागल आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता हे धरण काठोकाठ भरले. त्यामुळे उरणकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मागील वर्षी रानसई १३ जुलै ला भरले होते. यावर्षी पाऊस उशिराने सुरू होऊन ही २०२२ च्या तुलनेत अधिकचा अवघ्या पाच दिवसाचा कालावधी लागला आहे.
रानसई धरणातून उरण मधील औद्योगिक कारखान्यासह, येथील २५ पेक्षा अधिक ग्रामपंचायती व नगरपरिषद यांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र त्यासाठी लागणारा पाणीसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून येणारे उसणे पाणी घ्यावे लागत आहे. तर जानेवारीतच आठवड्यातील दोन दिवसांची पाणी कपात ही करावी लागत आहे. उरण मधील पाणी पुरवठ्यासाठी दररोज ४० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणाची साठवणूक क्षमता ही १० दशलक्ष घन मीटर वरून ७ दशलक्ष घन मीटर वर आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कमी पडू लागला आहे. पावसाळ्यात नोव्हेंबर पर्यंत पाणी नियमितपणे पुरवता येते मात्र त्यानंतर पाणी कपात करावी लागत आहे. त्यामुळे उरण मधील नागरीकांना पाणी पुरवठा करण्यासाठी धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
हेही वाचा… अॅप वरुन कर्ज घेणे पडले भलतेच महागात, महिलेसोबत अश्लील फोटो व्हायरल, दोन कुटुंबियांना झाला मनस्ताप
धरण क्षेत्रात आता पर्यंत ९८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मंगळवारी पहाटे ४ वाजता रानसई ने ११६ फुटाची पातळी गाठल्याने धरण भरून वाहू लागले असल्याची माहिती उरण एमआयडीसी चे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.