ऐरोली विधानसभेतील भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांच्यावर शनिवारी महिलेला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला संबंधित महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांना राज्य महिला आयोगाने निर्देश दिल्यानंतर त्यांच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांतील तक्रारदार महिला एकच आहे. नाईक यांच्याविरोधात महिलेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून २४ तास उलटत नाहीत तोच त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाईक यांच्याबरोबर गेल्या २७ वर्षांपासून ‘लिव्ह अॅण्ड रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘‘नाईक यांच्यापासून मला एक मुलगा झाला असून तो आता १५ वर्षांचा आहे. हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर त्याला आणि मला अधिकृतपणे स्वीकारण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले होते. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पाळला नाही, माझी फसवणूक केली’’, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
नाईक यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत महिलेने त्यांच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र नाईक यांनी पीडीत महिलेशी जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केले.
संबंधित महिलेच्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांचे आधी दुर्लक्ष
नवी मुंबई पोलिसांनी प्रथम पीडीत महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु नाईक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला असल्यामुळे राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आणि नवी मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.