नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा परिसरातील शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवक राम आशिष यादव यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच तिच्या मुलाचा स्वीकार न करता जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

यातील संशयित व्यक्ती  राम आशिष यादव हे शिवसेनेचे  (शिंदे गट) माजी नगरसेवक आहेत. त्यांनी  पीडित महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. यासाठी विविध लॉज व घरी हा प्रकार घडला. अनेकदा गर्भपातही करण्यास भाग पाडले. मात्र याच संबंधातून तिला एक मुलगा झाला. त्याचा स्वीकार करण्यासाठी पीडितेने अनेकदा विनवणी केली. मात्र तिला जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

हा सर्व प्रकार २००५ ते १८ मार्च २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी पीडित महिलेने नजीकच्या पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी यादव यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार, जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक आदी कलमान्वये सोमवारी  गुन्हा नोंद केला आहे. याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मात्र प्रयत्न करूनही यादव यांच्याशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळाली नाही.