पनवेल: सततच्या पावसामुळे रसायनी पोलीस ठाण्यात दोन फूट पाणी साचले आहे. रात्री तीन वाजल्यापासून रसायनी परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सूरुवात झाली. या दरम्यान पोलीस ठाण्याचा परिसरात पाणी तुंबले आहे. कर्तव्यावर असणा-या पोलीसांना ठाण्यात कसे काम करावे हे समजण्याच्या आत पाण्याने पोलीस ठाण्याचा ताबा घेतला. अखेर रात्रपाळीत काम करणा-या सर्व पोलीसांना ठाण्याच्या बाहेरुन काम करावे लागले.
दरवर्षी अतिवृष्टीमध्ये पोलीस ठाण्यात पाणी शिरते. शासन दफ्तरी याची नोंद असताना सरकारी आस्थापना सूरक्षित ठिकाणी हलवावे यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. रसायनी पोलीस ठाण्यात इतर पोलीस ठाण्यांप्रमाणे गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्याच्या अतिवृष्टीमध्ये एखादी गुन्ह्याची नोंद करायची असल्यास शेजारच्या पोलीस ठाण्यात करण्याची तजवीज पोलीसांना करावी लागणार आहे.
हेही वाचा… पनवेल: पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर गाढी नदीत पाणी इशारा पातळीच्या खाली
रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शत्रुघ्न माळी यांना याबाबत विचारले असता सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी सूखरुप असून पाणी शिरल्याने ठाण्यातून सध्या तरी कामकाज करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई आणि रायगड पोलीस आयुक्तालयाच्या वेशीवर रसायनी पोलीस ठाणे आहे.