मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक मंदीचे सावट पसरलेले असून या मंदीचा परिणाम उरणमध्ये घरांची खरेदी, सोने तसेच दुचाकी ते चारचाकी वाहन खरेदीवरही झाला आहे. याचा परिणाम येथील व्यवसायिकांवरही होऊ लागला आहे. घर बांधण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी खरेदी केलेल्या जमिनी मागणीअभावी ओस पडल्या आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची मागणी कमी झाल्याने सोने व्यवसायतही घट झालेली आहे. त्याचप्रमाणे वाहन खरेदीही थंडावली आहे, अशी येथे परिस्थिती पाहावयास मिळते.
सिडकोने विकसित केलेल्या द्रोणागिरी नोड परिसरात इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. उरणला जोडणाऱ्या रेल्वे मार्ग, जल व रस्ते मार्गाच्या जाळ्यामुळे उरणचा विकास होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी मागील वर्षी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याला मागणीही मोठी होती. परंतु गेल्या दोन वर्षांत मात्र त्याच्यावर परिणाम झाला आहे. उरणच्या मुद्रांक शुल्क कार्यालयात नोंदविलेल्या घर खरेदी दस्तानुसार २०१४ मध्ये एक हजार ७९७ घर खरेदीची नोंद झाली होती. तर या वर्षी २०१५ मध्ये आतापर्यंत १ हजार ५३३ दस्तांचीच नोंद झालेली आहे. त्यामुळे घर खरेदीवरही परिणाम झाला आहे. ग्राहकांनी घर खरेदी करावी यासाठी अनेक सवलती देण्याचाही प्रयत्न बांधकाम व्यवसायिकांकडून केला गेला असला तरी त्याचा परिणाम होत नाही.
या वर्षी लग्नसराई नोव्हेंबरपासूनच सुरू होणार असली तरी ज्या प्रमाणात उरणच्या बाजारातून रायगड, ठाणे, मुंबई या जिल्ह्य़ातील ग्राहकांकडून सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली जाते, त्यातही या वर्षी घट झाल्याची माहिती उरणमधील सोने व्यापारी बुवाजी यांनी सांगितले. सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याने तसेच अनेक ठिकाणचे इतर व्यवसाय बंद पडू लागल्याने सोनारांकडून सोने खरेदी करण्याऐवजी त्यांच्याकडे सोने गहाण ठेवण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या खरेदीवर परिणाम झाला आहे. या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावरही सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह नव्हता. तर दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीसाठी लागणाऱ्या कर्जाची फेड करण्यासाठी नोकरीच्या अर्थ उत्पन्नात घट झाल्याने अनेकांनी नवे कर्ज घेऊन वाहन खरेदी करणे बंद केले आहे. वर्षांला दोनशे ते अडीचशे दुचाकी वाहनांची खरेदी केली जात होती ती आता निम्म्यावर आली आहे. त्यामुळे या वर्षीची दिवाळी व लक्ष्मीपूजन ‘लक्ष्मी’च्या आगमनाची वाट पाहत साजरी करावी लागणार आहे.

Story img Loader