नवी मुंबई : नवी मुंबईत सध्या जीर्ण इमारतींच्या पुनर्निर्माणाची कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. ऐन दाट रहिवासी वस्तीत ही कामे सुरू असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. त्यात भर म्हणून दिवसभर गाड्यांचा खडखडाट सुरू असतो तर अनेक ठिकाणी रात्रीही कामे सुरू असल्याने रात्रीच्या नीरव शांततेत होणाऱ्या दणदणाटाने रहिवासी त्रस्त झाले आहेत. मनपा नियमांची पायमल्ली होत असेल तर कुठे तक्रार करायची हेच सामान्य लोकांना माहिती नसल्यामुळे मनपानेच गस्ती पथक ठेवावे अशी मागणी होत आहे.
नवी मुंबईत सध्या ११ ठिकाणी जीर्ण इमारतींच्या पुनर्निमाण काम सुरू आहेत तर तेवढ्याच इमारतींचे प्रस्ताव मनपाकडे प्रलंबित आहेत. यात सर्वाधिक चार ते पाच काम वाशीत सुरू असून सीबीडी, नेरुळ, कोपरखैरणे आणि ऐरोलीतही कामे सुरू आहेत.
हेही वाचा…पनवेल महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
नवी मुंबईत अनेक ठिकाणी कालबाह्य तर काही ठिकाणी सिडकोनेच निकृष्ट काम केल्याने जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न गेल्या पंचवार्षिक मध्ये तांत्रिक बाबीमधून मुक्त झाल्याने ही कामे वेगाने सुरु आहेत. घरांच्या पुनर्निमाण काम तेथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ही कामे होत असल्याने सध्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य झालेले असून दिवसभर ध्वनिप्रदूषण होत आहे.
नियमानुसार प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण होणे गरजेचे आहे, मात्र तांत्रिक अडचणींना सामोरे जाताना अनेकदा विलंब होतो. त्यामुळे मिळालेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची विकासकाची धडपड असते. त्यामुळे रात्रीही कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. या कामांबाबत त्या त्या ठिकाणच्या विभाग कार्यालयात तक्रार केली तर निवारण होते, मात्र सामान्य नागरिकांना नेमकी कुठे तक्रार करायची याची माहिती नसते. त्यात विकासकाशी कोण शत्रुत्व घेणार, अशी नागरिकांची सावध भूमिका असल्याची माहिती वाशीतील एका रहिवाशाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या विनंतीवरून दिली.
हेही वाचा…यंदा मलावी हापूसच्या उत्पादनात घट; एपीएमसी बाजारात आवक निम्यावर
शहरात बांधकाम करताना आसपास कोणाला त्रास होऊ नये याची खबरदारी विकासकाने घेणे आवश्यक आहे. त्याबाबत निकष ठरलेले आहेत. जर कोणी नियमबाह्य काम करत असेल तर संबंधित विभाग कार्यालयात तक्रार करता येते. सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक नगररचना