लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी ७९५ कोटी मालमत्ता कर वसुली केली आहे. कार्यालयीन वेळेनंतर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची मुदत असल्याने मालमत्ता कराच्या वसुलीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी तसेच मालमत्ताकर विभागाने कर थकबाकी असलेल्यांच्या जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याचा महत्वपूर्ण घेतला. त्यामुळे सलग तीन वर्ष मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना व आस्थापनांना पालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. तसेच शासकीय आस्थापनांचीही थकीत वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक मालमत्ता कर वसुली या आर्थिक वर्षात झाली.

जप्तीची कारवाई प्रस्तावित असलेल्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ताकर त्वरित भरावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते. अन्यथा जप्त मालमत्तांवर एप्रिल २०२५ पासून लिलाव कारवाई करण्यात येईल असेही सूचित करण्यात आले होते. तसेच पालिकेने मालमत्ता कर थकबाकी असलेल्या आस्थापना, संस्था यांच्या ठिकाणी जाऊन ढोलताशा मोहीम हाती घेतली होती. महानगरपालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या विविध मालमत्तांवर ‘कर आकारणी व कर संकलन विभाग’ यांच्यामार्फत मालमत्ता कर आकारणी व वसूलीची वेगवान कार्यवाही यावर्षी करण्यात आली होती.

सुट्टीच्या दिवशीही कार्यालये मालमत्ता कर जमा करण्यासाठी कार्यालये सुरू ठेवण्यात आली होता. तसेच थकबाकीदारांना करभरणा करण्यासाठी १० मार्च २०२५ पासून ‘अभय योजना’ सुरू केली होती. थकीत कराच्या विलंब शुल्कावर ५० टक्के सूट देणाऱ्या अभय योजनेचा ३१ मार्च २०२५ पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ७९५ कोटीपर्यंत मालमत्ता कराची वसुली केली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे. १ एप्रिलच्या आकडेवारीत नक्कीच ८०० कोटी पार होतील. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक प्रयत्नांमुळे यंदा सर्वाधिक मालमत्ता कर वसुली करता आली. -शरद पवार ,उपायुक्त, मालमत्ता कर व प्रशासन विभाग

नवी मुंबई महापालिकेची गेल्या ४ वर्षांतील मालमत्ता कर वसुली

  • वर्ष २०२४-२५ – ७९५ कोटी
  • वर्ष २०२३-२४ – ६६६ कोटी
  • वर्ष २०२२-२३ – ५६२ कोटी
  • वर्ष २०२१- २२ – ५२१ कोटी