नवी मुंबई : मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तसेच गोव्याला जोडणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावर स्थानिक गुंड खासगी बसचालकांकडून बळजबरीने हप्तेवसुली करत आहेत. मात्र वेळेवर प्रवाशांना पोहचवणे अनिवार्य असल्याने बसचालक पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. मात्र हे प्रकार जास्त वाढल्याने वाहतूक संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक व वाहतूक संघटनेने याबाबत पोलीस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे.
शीव-पनवेल महामार्गावरून हजारो प्रवासी बस रोज ये जा करत असतात. मुंबईच्या वाहतूक कोंडीतून सुटून या बस जेव्हा नवी मुंबईत प्रवेश करतात तेव्हा बहुतांश गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने येतात. बस ज्या ज्या ठिकाणाहून प्रवासी भरते अशा ठिकाणी स्थानिक गुंड बस चालकांकडे हप्ता मागत असतात. हा प्रकार सर्वाधिक सानपाडा आणि जुईनगर येथे होतो. वाशी आणि सीबीडी येथे नजरेच्या टप्प्यात वाहतूक पोलीस चौकी असल्याने या दोन्ही ठिकाणी फार तुरळक असे प्रकार होतात. हे हप्ते ५ हजारांपर्यंत मागितले जातात आणि शेवटी तडजोड करीत मिळेल ती रक्कम स्वीकारली जाते.
आणखी वाचा-एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले तर किमान तीन ते चार तास लागतात. त्यामुळे चालक पोलिसाकडे जात नाहीत. तक्रारच होत नसल्याने पोलिसही लक्ष देत नाहीत. मात्र आता संघटनेच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक व वाहतूक संघटनेने याबाबत पोलीस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे यांनी दिली.