अग्निशमन विभागातील २६० उमेदवारांच्या चाचणीचा प्रश्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिकेत ४४८ पदांची भरती प्रकिया अंतिम टप्प्यात असून यातील अग्निशमन विभागातील २६० पदांची शारीरिक चाचणी जलतरण तलाव उपलब्ध होत नसल्याने थांबली आहे. यासाठी पालिका खासगी तलावाच्या शोधात आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाची गरज अधोरेखित झाली आहे.

महापालिका खेळांच्या सुविधांबाबत नेहमीच उदासीन आहे. पंचवीस वर्षांत शहरात पालिकेला एकही स्वतंत्र जलतरण तलाव बनवता आला नाही. त्यामुळे शहरात कॉमनवेल्थ गेमसह जलतरणात एशियन रेकॉर्ड बनवणारे जलतरणपटू असताना त्यांना सरावासाठी दुसरीकडे जावे लागत आहे.

नवी मुंबई महापालिकेत रिक्त पदांमुळे आरोग्य व अग्निशमन विभागाची सेवा देताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ४४८ पदांची भरती प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. यातील २६० पदे ही अग्निशमन विभागातील आहेत. या भरतीतील उमेदवारांची लेखी परीक्षाही झाली असून त्यांचा निकालही लागला आहे. परंतु यात उत्तीर्ण झालेल्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. यात धावणेसह पोहण्याचीही चाचणी घेतली जाणार आहे. मात्र, यासाठी पालिकेला त्या दर्जाचा जलतरण तलाव अद्याप उपलब्ध झाला नाही. पालिकेकडे स्वत:चा तलाव नसल्याने ही वेळ आली आहे. बेलापूर येथील वायएमसीए तलाव उपलब्ध झाल्यानंतर पोहण्याची चाचणी घेतली जाणार आहे. यामुळे पुन्हा एकदा पालिकेकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव असणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.

शहरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये यश मिळवलेले जलतरणपटू आहेत. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू व प्रशिक्षकही शहरात आहेत. परंतु ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव मात्र नाही. प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागत असल्याचे जलतरणपटू शुभम वनमाळी यांनी सांगितले.

वर्षभरात तलाव होणार

जलतरण तलाव निर्मितीसाठी वाशी सेक्टर १२ येथील भूखंड क्रमांक १९६ अे पाच वर्षांपूर्वीच पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. त्यानंतर हा भूखंड जलतरणासाठी कमी पडत असल्याने एनएमएमटीसाठी दिलेल्या भूखंडातील काही भाग जलतरणासाठी वर्ग करून चार हजार चौरस मीटरचा भूखंड जलतरणसाठी घेण्याचे नियोजन करण्यात आले असून वर्षभरात पालिकेचा हक्काचा जलतरण तलाव तयार होण्याची आशा आहे.

अग्निशमन विभागात भरती प्रक्रिया सुरू आहे. या उमेदवारांची शारीरिक चाचणी शिल्लक आहे. पोहण्यासाठी बेलापूर येथील वायएमसी संस्थेचा जलतरण तलाव उपलब्ध झाल्यानंतर महिनाअखेपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. वाशी येथे सुसज्ज असा तरणतलाव तयार करणार आहे.

– डॉ. रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई महापालिका