लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६२० रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार २८ मार्च पासून ११ मे पर्यंत आहे.
नवी मुंबई महापालिकेत २००८ नंतर प्रथमच सर्वात मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने ‘लोकसत्ता’ला दिली आहे. भरतीमध्ये विविध ३० प्रकारच्या ६२० कायम जागांसाठी ही भरती होणार आहे.
पालिकेतील ३९३५ पदांच्या २२१ संवर्गाच्या आकृतीबंधाला शासनाने २१ ऑगस्ट २०१७ रोजीच मंजुरी दिली होती. शासनाकडे सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाल्यानंतर २००८ पासून अनेकजन सेवानिवृत्त झाले तर अनेकांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. महाराष्ट्रात इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय खर्च कमी आहे. कमी कर्मचाऱ्यांच्या बळावरही चांगले काम होत असल्याबाबत मंत्रालयीन स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिकेचे कौतुक केले आहे.
पदे कोणती?
- लिपीक- टंकलेखक,लेखा लिपिक तसेच स्टाफ नर्स व मिडवाईफ नर्स, कनिष्ठ अभियंता, आया, वॉर्डबॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा.
- बायोमेडिकल इंजिनिअर,कनिष्ठ अभियंता, उद्यान अधिक्षक,उद्यान सहाय्यक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी,वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजनिस्ट, डायलिसिस तज्ञ सांख्यिकी सहाय्यक इसिजी तंत्रज्ञ,सेन्ट्रल सर्जिकल सुपरवायजर,आहार तंत्रज्ञ,नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी,आरोग्य सहाय्यक (महिला),ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ,सहाय्यक ग्रंथपाल अशी विविध ३० प्रकारची पदे.
- भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तसेच विविध पदे व त्यांची संख्या यांची माहिती पालिकेच्या http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
संपूर्ण पारदर्शक पध्दतीने भरतीप्रक्रिया होणार आहे. अर्ज स्वीकारण्यापासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने होणार असून टीसीएसद्वारे अत्यंत नियोजनबध्द व पारदर्शक भरती करण्यात येणार आहे. -डॉ.कैलास शिंदे, आयुक्त,नवी मुंबई महापालिका
ऑनलाइन अर्जाचे वेळापत्रक
अर्ज नोंदणी सुरू – २८ मार्च २०२५
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत- ११ मे २०२५ ( वेळ रात्री ११.५५ मि.पर्यंत )
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत- ११ मे २०२५
ऑनलाइन प्रवेशपत्र – परीक्षेच्या ७ दिवस आधी
ऑनलाइन परीक्षा – नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर