नवी मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन मार्फत ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ हा अभिनव उपक्रम १५ मेपासून ५ जूनपर्यंत राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘२१ दिवस चॅलेंज’ अंतर्गत ‘थ्री आर’ ही संकल्पना राबविली जात आहे.
घनकचरा व्यवस्थापनात ‘थ्री आर’ ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून यामध्ये कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात तब्बल ९२ ठिकाणी ‘थ्री आर सेंटर्स’ सुरू असून आता त्यापुढे ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उपक्रमांतर्गत ‘थ्री आर’च्या अनुषंगाने ‘रिसायकल मार्ट’ ही संकल्पना राबविले जात आहे.
बेलापूर येथील डी मार्टमध्ये याची सुरुवात ककरण्यात आली आहे. ‘रिसायकल मार्ट’ ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना असून ‘थ्री आर’ च्या अनुषंगाने यामध्ये नागरिकांनी घरातील वापरून झालेले कपडे, प्लास्टिक बॉटल्स, वस्तू व दुधाच्या पिशव्या, लेदरचे साहित्य, भांडी, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा टाकाऊ वस्तू डी मार्टमध्ये आणून दिल्यास त्यावर त्यांना वस्तूंनुसार पॉईंट्सची कुपन्स दिली जाणार आहेत. त्या पॉईंट्सनुसार त्यांना तितक्या रक्कमेची सूट त्यांनी डी मार्टमध्ये खरेदी केलेल्या नव्या सामानावर दिली जाणार आहे. याव्दारे घरातील सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या वस्तू उपलब्ध करून देऊन नागरिकांकडून पर्यावरण रक्षणाला हातभार लावला जाणार आहे. शिवाय त्या टाकाऊ वस्तूंच्या बदल्यात नागरिकांना पॉईंट्स स्वरुपात आर्थिक लाभही होणार आहे.