नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ८२६.१२ कोटी मालमत्ता कर वसुली केली असून सर्वाधिक वसुली घणसोली विभागातून झाली आहे. पालिकेच्या वाढीव उत्पन्नात पुनर्विकास प्रकल्पांच्या परवानगीमुळे गतवर्षीपेक्षा पालिकेच्या नगररचना विभागाचे उत्पन्न तब्बल ७८ कोटी अधिक प्राप्त झाले आहे. तर आगामी ५ वर्षात पुनर्विकास प्रकल्पांमुळे पालिकेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होण्याचा खात्री नगररचना विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाच्या वाढत्या आलेखाला पुनर्विकास प्रकल्पांची साथ लाभणार असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने केलेल्या धडककृतीमुळे चांगली वसुली झाली आहे. त्यात सर्वाधिक वाटा नगररचना विभागाचा आहे. नवी मुंबई शहरात पुनर्विकास प्रकल्पांना वेग आला असून नगररचना विभागामार्फत बांधकाम परवानगी पोटी यंदा ३८१.९० कोटी इतके शुल्क जमा झाले असून यामध्ये पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावांच्या मंजुरीचा मोठा भाग असल्याचा पालिकेने मान्य केले आहे. नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्पामुळे नगररचना विभागाचे उत्पन्न वाढले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नगररचना विभागाचे उत्पनन ७८ कोटींनी वाढले आहे. नवी मुंबई शहरात पुनर्विकास प्रकल्पांना वेग आला असून आगामी पाच वर्षांत पालिकेचे नगररचना विभागाचे उत्पन्न कित्येक पटीत वाढणार आहे. शहरात सर्वात झपाट्याने विकास होत असून पुनर्विकासाचे केंद्रबिंदू वाशी उपनगर ठरले आहे. आता ३० वर्ष झाल्येल्या इतरही विभागातील उपनगरात पुर्विकासाचे वारे होऊ लागले आहेत. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूर तसेच सर्वच विभागात पुनर्विकासाचे वेध लागले असल्याने आगामी काळात पालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा नगररचना विभागाचा राहणार आहे.
त्यातच एकीकडे शहरात स्वयंपुनर्विकासाबाबतही नागरिक चाचपणी करत असून २५ वर्षे आयुर्मान असलेल्या इमारतीमधील नागरिकांनीही आतापासूनच कागदपत्रांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. काही बांधकाम व्यावसायिकही पुनर्विकासात जाणाऱ्या इमारतीमधील नागरिकांशी संधान बांधून आहेत.त्यामुळे आगामी काळात पालिकेच्या इतर उत्पन्नाबरोबरच सर्वांचे लक्ष नगररचना विभागातून पुनर्विकासाच्या परवानग्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाकडे अधिक राहणार आहे.
यंदाच्याआर्थिक वर्षात नगररचना विभागामार्फत ३८१.९० कोटी जमा झाले आहेत यात पुनर्विकास प्रकल्पांचा मोठा वाटा असून गेल्यावर्षी नगररचना विभागातून ३०४ कोटी जमा झाले होते. यंदा ७८ कोटींची वाढ असून शहरात आगामी काळात होणाऱ्या पुनर्विकासामुळे नगररचना विभागाचे उत्पन्न वाढणारच आहे. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत पाच जास्त परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे पुनर्विकासामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होत राहणार हे निश्चित आहे. -सोमनाथ केकाण, सहाय्यक नगररचना संचालक