संतोष जाधव
राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप दूर होणार
महापालिकेची शहरातील पाच मंगल कार्यालये व बहुउद्देशीय सभागृह भाडय़ाने देण्यासाठी वाढलेल्या हस्तक्षेपाच्या तक्रारी आल्यानंतर पालिका आयुक्तांनी याची नोंदणीच ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी सांगितले.
पालिकेने नागरिकांना लग्नकार्य, मुंज, साखरपुडा, विविध कार्यशाळा, मेळावे, सभा, प्रदर्शन, बैठका, वाढदिवस यांसह विविध प्रयोजनांसाठी बेलापूर, नेरुळ, जुईनगर, कोपरखैरणे, ऐरोली येथे ५ मंगल कार्यालये, बहुउद्देशीय सभागृह उभारली आहेत. आता बेलापूर येथे उभारलेले वारकरी भवनही यासाठी वापरता येणार आहे. खासगी कार्यालयासाठी आकारले जाणारे भाडे न परवडणारे असते. म्हणून पालिकेने या ठिकाणी वातानुकूलित व बिगर वातानुकूलित असे सभागृह तयार करण्यात आली आहेत. ही बहुउद्देशीय सभागृह त्या त्या विभाग कार्यालयांतर्गत विभाग अधिकाऱ्यांमार्फत भाडय़ाने दिली जातात. मात्र त्यात हस्तक्षेप वाढला आहे. आयुक्तांकडे नुकतेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तक्रारही केली होती. त्यामुळे आयुक्तांनी हा हस्तक्षेप दूर करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा करण्याचे ठरविले आहे. यासाठी वेगळी संगणक प्रणाली विकसीत करण्यात येत आहे. यावर पाचही ठिकाणच्या मंगल कार्यालयातील हॉलची उपलब्धता, भाडे याबाबत माहिती असणार आहे. तसेच खानपान प्रबंधक व डेकोरेटर्स सुविधा पुरविण्यासाठी स्वामित्व शुल्क अर्थात रॉयल्टी आकारण्याबाबतचा प्रस्तावही पालिकेने तयार केला आहे.
ही सभागृह भाडय़ाने देताना प्रशासकीय व राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आणून दिले आहे. जुईपाडा येथील मंगल कार्यालयात एकाच खानपान व डेकोरेटर्सचे साहित्य घेण्याचा आग्रह होतो.
– राजेश पोसम, जुईनगर
पालिकेच्या बहुउद्देशीय सभागृहातील भाडे नक्कीच इतर खासगी कार्यालयांपेक्षा कमी आहे. आता कोणालाही ते नोंदणी करता येईल. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. लवकरच ही सेवा सुरू होईल.
– डॉ.रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका