नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याने प्रकल्पग्रस्तांनी जुलै महिन्यापासून घरे रिकामी करून इतरत्र स्थलांतर करावे, या सिडकोच्या निर्णयाविरोधात दहा गावांतील काही प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक झाला आहे. मागील आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैना क्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन देशाच्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी ३ जून रोजी संध्याकाळी एक बैठक चिंचपाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच तीव्र नापसंती व्यक्त केली जाणार आहे.

दोन हजार २६८ हेक्टर क्षेत्रफळावर उभ्या राहणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी दहा गावांतील ६७१ हेक्टर जमीन आवश्यक आहे. जागतिक निविदेद्वारे देण्यात येणाऱ्या विमानतळ उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. मात्र सिडकोच्या वतीने केल्या जाणाऱ्या सपाटीकरण, भराव, टेकडी कपात, गाढी नदी पात्र बदल यांसारख्या कामांचा प्रारंभ पुढील महिन्यात केला जाणार आहे. त्यासाठी दहा गावांचे स्थलांतर आवश्यक असल्याने सिडकोने प्रकल्पग्रस्तांना १८ महिन्यांची मुदत दिली आहे.

त्यामुळे घरे रिकामी करण्याचे संमतीपत्र येत्या पंधरा दिवसांत देणे अनिवार्य आहे. त्यासाठी सिडको सुमारे साडेतीन हजार प्रकल्पग्रस्तांना मासिक भाडे देऊन स्थलांतरित करणार आहे. सिडकोच्या या सक्तीला काही प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडविले जातील; पण कोणीही प्रकल्पाला अडथळा आणू नये, असे स्पष्ट केले आहे. या वेळी काही नेत्यांनी सर्वेक्षणातून सुटलेल्या घरांना प्रकल्पग्रस्त यादीत सामावून घेण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे बांधकाम खर्च वाढवून देण्यास सांगितले, मात्र बांधकाम खर्चाबाबत घरांची बांधकामे प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना एक मर्यादा घालण्याची आवश्यकता आहे अन्यथा त्या मारुतीच्या शेपटीसारख्या वाढत जातील, असा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नवीन मागण्या नियंत्रणात ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रकल्पग्रस्तांचे आक्षेप आणि मागण्या

  • पुढील १८ महिन्यांत स्थलांतरित गावे वडघर, वहाळ येथे पायाभूत सुविधांची उभारणी होईल का? धार्मिक स्थळे, शाळा, मैदान, कधी बांधणार?
  • स्थलांतरित गावांचा विकास करा आणि त्या ठिकाणी थेट प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा. भाडय़ाने १८ महिने राहण्याची सक्ती का?
  • दहा गावांतील काही प्रकल्पग्रस्तांची घरे सर्वेक्षणातून सुटलेली आहेत त्यांचा अंतर्भाव करा. भावबंधांना सोडून कसे स्थलांतरित होणार?
  • सिडको स्थलांतरित गावात एक हजार रुपये प्रति चौरस मीटर दराने बांधकाम होऊ शकते का? नवी मुंबईत सध्या अडीच ते तीन हजार रुपये प्रति चौरस फूट बांधकामाचा खर्च होत आहे.
  • प्रकल्पग्रस्तांची नवीन घरे सिडकोने त्यांच्या आराखडय़ानुसार बांधून द्यावीत
  • पुष्पकनगरचा विकास कधी होणार
  • पावसाळ्यात स्थलांतराची सक्ती का?

Story img Loader