किती मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आरोपीलाच आठवेना

नवी मुंबई पोलिसांनी मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रेहान कुरेशीला अटक केल्यानंतर तपासात अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.  त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पालघरमधील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार असून या पथकामार्फत पुढील तपास केला जाणार आहे. यामुळे आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करणे सोपे होणार आहे.

आरोपीने किती मुलींचे लैंगिक शोषण केले हे त्यालाच आठवत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे पीडित मुलींचे पालक गुन्हा नोंदवण्यास तयार नाहीत.

२०१५ पासून १५ मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रेहान कुरेशीला अटकेपासून त्याला शिक्षा होण्यासाठी सबळ पुरावे गेळा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा ठाम विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. रेहानला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर केलेल्या चौकशीत आणि नेहमीप्रमाणे अन्य ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे आहेत का? या तपासात ओशिवरा आणि खारघर येथील दोन गुन्ह्यांची वाढ झाली आहे. त्याव्यतरिक्त तीन ठिकाणी त्याने अशाच पद्धतीने कृत्य केल्याची कबुली दिली आहे. मात्र दुर्दैवाने त्या तिन्ही ठिकाणच्या घटनेतील पीडितांच्या पालकांनी गुन्हा नोंद केला नाही. केस बळकट होऊ न अशा नराधम आरोपीस शिक्षा व्हावी या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी या तिन्ही पीडितांचा शोध घेत पालकांना गुन्हा नोंद करण्याचे आवाहन केले आहे. मात्र तिन्ही ठिकाणी पालकांनी नकार दिला. त्यामुळे गुन्हा करूनही आणि आरोपीकडून कबुली मिळूनही पोलिसांना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

रेहान याने पहिला तळोजातील बलात्काराचा गुन्हा केल्यानंतर अटक न झाल्याने धडा घेतला आणि त्यानंतर एक एक करीत गुन्हा करीत राहिला. प्रत्येक गुन्ह्यानंतर पकडला न गेल्याने तो निर्ढावला गेला आणि गुन्ह्यात वाढ होत गेली. त्यामुळे त्याने नक्की किती विनयभंग केले हे त्यालाच आठवत नाही.असे समोर आल्यावर पोलीसही चक्रावले आहेत.

मुलींची अश्लील छायाचित्रे काढली होती

नालासोपाऱ्याच्या तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने १४, २० आणि २१ सप्टेंबर या दिवसांत तीन गुन्हे केले होते. त्यापैकी दोन गुन्ह्य़ांतील मुलींनी त्याच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात यश मिळवले होते. कुरेशीवर अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. काही प्रकरणात त्याने मुलींचे अश्लील छायाचित्रे काढली होती. त्यासाठी त्याचा मोबाइल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतही पाठवण्यात आला आहे.

आरोपीने केलेल्या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांतील पीडितांना आवाहन करूनही गुन्हा नोंद केला जात नाही ही खूप मोठी तांत्रिक अडचण पोलिसांच्या समोर आहे. मात्र आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्याने केलेल्या गुन्ह्यांची पाळेमुळे खणून काढू.

– तुषार दोषी, उपायुक्त गुन्हे शाखा