नवी मुंबई : शनिवारी नवी मुंबईतील नेरुळ येथील स्किनसौल क्लिनिकमध्ये महिला कर्मचाऱ्याने रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
जरीना रेहमान शा असे मृत महिलेच नावं असून मागील १० वर्षांपासून सदर महिला या क्लिनिकमध्ये काम करत होती. महिलेने १० हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप क्लिनिकच्या डॉक्टरने करत तिच्या नातेवाईकांना बोलावले होते. मृत महिलेला नेरुळमधील क्लिनिकमध्येच फाशी देऊन मारून टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून जोपर्यंत क्लिनिकमधील डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
हेही वाचा – नवी मुंबई : मोबाईल चोरी करणारे ३ जेरबंद, १३ लाख ६७ हजार रुपयांचे मोबाईल जप्त
हेही वाचा – नवी मुंबई तिरंगामय, भव्य तिरंगा बाईक रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
याबाबत नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांना विचारणा केली असता महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्टर स्नेहा थडाणी यांच्या विरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भगत यांनी दिली.