लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : पावसाळ्यापूर्वीच तालुक्यातील पूरग्रस्त गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिरनेर गावातील पाण्याचा निचरा होणारे पाइप व साकवांच्या सफाई व बांधकाम याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पुराचा धोका कमी होण्याची शक्यता दिसू लागली आहे. दरवर्षी या गावातील शेकडो घरे पाण्याखाली येत आहेत.
चिरनेर जंगल सत्याग्रह आणि चिरनेर श्री महागणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिरनेर गावाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, दरवर्षी या भौगोलिक परिस्थितीमुळे येथे उद्भवणारी पूरसदृश परिस्थिती आणि त्यातील असुरक्षितता हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला होता. मात्र या पूरसदृश परिस्थितीची सोडवणूक करण्यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीच्या आणि चिरनेर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरवर्षी उद्भवणारी ही पुराची समस्या आता तरी सुटणार म्हणून येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चिरनेर गावाच्या मुख्य हायवेला असणाऱ्या लहान आकाराच्या मोऱ्या आणि येथील काही मोऱ्या काही वर्षांपासून भरावामुळे बुजल्या गेल्या आहेत.
आणखी वाचा-घणसोली गावात पुन्हा १८ तास वीजविघ्न
नागरिकांकडून समाधान
- चिरनेरच्या मुख्य मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन ठिकाणी मोठ्या आकाराचे पाइप तसेच या रस्त्यावर एक साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
- या कामाला मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तरी चिरनेरकरांची पुराच्या संकटापासून सुटका होईल, अशा भावनांच्या प्रतिक्रिया चिरनेरच्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त करीत समाधान व्यक्त केले आहे.