पालिकेची पोलीस ठाण्यांना सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस ठाण्यांच्या आवारातील विविध धार्मिक स्थळे हटविण्यात यावीत, अशी सूचना नवी मुंबई पालिकेने सर्व पोलीस ठाण्यांना एका पत्राद्वारे केली आहे. पोलीस ठाण्यांनी ही धार्मिक स्थळे स्वत:हून हटवावीत; अन्यथा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ती हटविणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाला भाग पडेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अनेक पोलीस ठाण्यांत धार्मिक स्थळे बांधण्यात आली आहेत. बेकायदा धार्मिक स्थळांबद्दल पोलीस ठाण्यांना नोटीस देणारी नवी मुंबई ही पहिलीच पालिका असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्यातील सप्टेंबर २००९ नंतरची सर्व बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यापूर्वीच्या बेकायदा धार्मिक स्थळांना स्थलांतर, नियमित करणे अथवा तोडणे असे पर्याय ठेवलेले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ४४८ बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. त्यात सिडको हद्दीतील ३२६ बेकायदा धार्मिक स्थळांचे नव्याने सविस्तर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, तर एमआयडीसी हद्दीतील १०० बेकायदा धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई पावसाळ्यातही केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या सर्व सर्वेक्षणातून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळे वगळण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास येणाऱ्या विविध धर्माच्या नागरिकांना एका विशिष्ट धर्माचे स्थळ दिसते आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. राज्य सरकारनेही मध्यंतरी कोणत्याही शासकीय कार्यालयात देवदेवतांच्या तसबिरी लावण्यास बंदी घातली आहे. संपूर्ण देश हा संविधानाच्या आधारे चालत असल्याने एखाद्या विशिष्ट धर्माची प्रतिके शासकीय कार्यालयांत असणे हा गुन्हा ठरतो. हाच गुन्हा अनेक पोलीस ठाण्यांनी केला असून नवी मुंबईतील २० पोलीस ठाण्यांपैकी बहुतेक ठाण्यांच्या आवारात विविध देव देवतांची मंदिरे आहेत.

पालिका हद्दीत अशी १२ पोलिस ठाणी आहेत. माजी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनीही अशा पोलीस ठाण्यांतील धार्मिक स्थळांना मज्जाव केला होता.

काही पोलीस ठाणी तर देवांचे उत्सवही साजरे करतात. यात सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाचाही समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सर्व स्थानिक प्राधिकरणांना १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले आहेत. यात या पोलिस ठाण्यांच्या आवारातील धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. याशिवाय पालिकेने सिडको, कोकण भवन, एपीएमसी, कोकण रेल्वे, बेलापूरमधील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या आवारात बांधण्यात आलेली बेकायदा धार्मिक स्थळे तसेच इमारतींच्या आवारात लटकविण्यात आलेले देव्हारे, भित्तीचित्रे हटवण्याच्या सूचना त्या त्या प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ही धार्मिक स्थळे व प्रतिमा न हटविल्यास पालिका ती तोडण्याची कारवाई करणार आहे.

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या आवारातील धार्मिक स्थळे हटविण्याची पत्रे देण्यात आली आहेत. ती त्यांनी स्वत:हून हटविणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका कारवाई करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सर्व बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्यास नोव्हेंबपर्यंत मुदत दिलेली आहे.  अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका