नवी मुंबई : खारघर उपनगरामधील सेक्टर ३६ येथील सिडकोच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हॅलीशिल्प’ या उच्च उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण सोसायटीतील विक्रीविना शिल्लक १४२ सदनिकांचे देखभाल-दुरुस्ती शुल्क सिडकोने थकविले आहे. याबाबत सोसायटीने सिडको मंडळाला पत्र लिहून सोसायटीमधील सिडकोच्या १४२ सदनिकांचे मार्च २०२१ ते डिसेंबर २०२४ या कालावधीचे मासिक देखभाल शुल्कापोटीचे थकीत असलेल्या ९ कोटी १४ लाख रुपयांची मागणी केली आहे. सिडकोच्या पणन विभागाने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, याच सोसायटीमधील मध्यम उत्पन्न गटातील ११८ घरांची आणि उच्च उत्पन्न गटातील १३६ घरांची सोडत मागील वर्षी सिडकोने जाहीर केली होती.

सिडको महामंडळाने आठ वर्षांपूर्वी खारघर उपनगरामधील सेक्टर ३६ येथे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी १३०० घरांच्या ‘व्हॅलीशिल्प’ हा महत्त्वाकांक्षी महागृहनिर्माणाचा ताबा रहिवाशांना दिला. सिडकोने पहिल्यांदाच गृहनिर्माण प्रकल्पात व्यायामशाळा आणि क्लबहाऊस अशा सुविधा रहिवाशांना दिल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र सिडकोच्या या सुविधांची चर्चा होती. मात्र आता याच गृहनिर्माणातील क्लबहाऊसची अवस्था ओसाड झाली आहे. दोन फुटापर्यंत येथे रान वाढले आहे.

सिडको मंडळाने मागील वर्षी ‘व्हॅलीशिल्प’ सोसायटीतील उच्च उत्पन्न गटाच्या श्रेणीतील एक हजार चौरस फुटाच्या घराची किंमत दोन कोटी ५५ लाख रुपये एवढी दर्शविली होती. व्हॅलीशिल्प सोसायटीत ही घरे आठ वर्षे विक्रीविना पडून असल्याने त्याचा भुर्दंड इतर सदनिकाधारकांवर पडला आहे. सोसायटीने सिडकोच्या नगर सेवा विभागाच्या व्यवस्थापकांना याविषयी ११ जानेवारीला पाठविलेल्या देयकाच्या मागणी पत्रामध्ये थकीत देखभाल शुल्क ६ कोटी २८ लाख रुपये आणि विलंब आकार शुल्क दोन कोटी ७० लाख रुपये आकारला आहे. तसेच इतरही सेवांविषयी शुल्क देयकात आकारले आहे. अद्याप सिडकोने व्हॅलीशिल्प सोसायटीच्या देयकाची दखल घेतली नाही.

मागील अनेक महिने यामुळेच क्लब हाऊस बंद असल्याने रहिवाशांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकारी प्रिया रातांबे यांच्याकडे संपर्क साधला असता, त्यांनी माहिती घेऊन प्रतिक्रिया देते असे सांगितले

व्हॅलीशिल्पतील घरे

व्हॅलीशिल्प सोसायटीमध्ये १२२० सदनिका आणि दीडशे गाळे आहेत. यामध्ये उच्च उत्पन्न गटासाठी ४२२ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ८०० सदनिका आहेत. ४० गाळे दुकानांसाठी आणि ११० कार्यालयांचे नियोजन आहे.

सुविधा

क्लबहाऊस, तरणतलाव, टेनीसकोर्ट, व्यायामशाळा, बॅडमेंटन कोर्ट, स्वाक्श कोर्ट, योगा हॉल, कॅफेटेरीया, सोना व स्टीमबाथ, सभागृह, गेस्टरुम, पोडीयम गार्डन व उद्यान अशा सुविधा दिल्या होत्या.

Story img Loader