नवी मुंबई: शीव-पनवेल मार्गावरील नेरुळ येथील एलपी उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दुसरा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात केवळ एकच मार्गिका सुरू राहणार असल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना तब्बल एक महिना करावा लागू शकतो. याची रंगीत तालीम आज (शनिवारी ) वाहतूक पोलिसांनी घेतली.
शीव-पनवेल मार्गाचे संपूर्ण काँक्रीटीकरण झाले असले तरी काही पुलांवर मात्र काँक्रीटीकरण झालेले नाही. हे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने टप्प्या टप्प्याने सुरू केले आहे. नेरुळ येथील एलपी उड्डाणपुलावरील पुण्याच्या दिशेने जाणार्या एका मार्गिकेचे काँक्रिटीकरण गेल्या काही महिन्यांपुर्वी पूर्ण करण्यात आले. आता पुण्याकडे जाणार्या आणखी दोन मार्गिकांचे कांक्रीटकरण एकाच वेळी उद्यापासून (रविवार) सुरू करण्यात येणार आहे. हे काम सुमारे महिनाभर चालणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेच पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.
रंगीत तालिम यशस्वी
दोन मार्गिकांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यापुर्वी आज वाहतूक पोलिसांनी रंगीत तामिल घेतली. पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणार्या सर्व मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या. संपूर्ण वाहतूक पुलाच्या खाली असलेल्या मार्गिकांवरून आणि सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली. सायंकाळी गर्दीच्या वेळी पुन्हा पुण्याकडे जाणार्या तिन्ही मार्गिका काही काळासाठी बंद करण्यात आल्या. संपूर्ण दिवसभर झालेल्या रंगित तालिमचा आढावा घेऊन उद्यापासून तिन्ही मार्गिका बंद ठेवायच्या की एक चालू ठेवायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे..
पर्याय कोणता
एलपी जंक्शनचा पुलावरील प्रवास टाळण्यासाठी हलक्या वाहनांना पामबिच मार्गाचा वापर करता येणार आहे. जड आणि अवजड वाहनांना तुर्भे जंक्शन येथून सर्व्हीस मार्गाने प्रवास करून उरण फाटा येथे पुन्हा शीव-पनवेल मार्गावर येता येणार आहे. शिळफाटा येथून पुण्याच्या दिशेने जाणार्या वाहनांना महापे उड्डाण पुलाखालून एचपी मार्गाने थेट उरणफाटा येथे येणार आहे.
ओमप्रकाश पवार (उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग) आज वाहतूक पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार आहे मात्र हे काम झाल्यावर वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील खड्डे, या पासून कायमची मुक्तता होऊन सुसाट रस्ता तयार होईल. वाहन चालकांनी त्यामुळे सहकार्य करावे.