उरण: तालुक्यातील फुंडे, डोंगरी व पाणजे या तीन गावांना जोडणाऱ्या चिखलमय व खड्डेयुक्त धोकादायक रस्त्याची दुरुस्ती रविवारी करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील तीन गावातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव घरत यांनी केले आहे.
चिखलमय व निसरड्या मार्गावरून येथील विद्यार्थ्यांना ही प्रवास करावा लागत असल्याने धोका निर्माण झाला होता. उरण शहर व जेएनपीटी सारख्या आंतराष्ट्रीय बंदरा पासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर वसलेल्या फुंडे, डोंगरी व पाणजे या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील फुंडे रस्त्यातील खाडीपूल एप्रिल २०२१ मध्ये अचानक कोसळला आहे.
हेही वाचा… पनवेल : उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्यसेवकांची निवासाची सोय कधी होणार?
या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या डाऊर नगर येथील एका तरुणांला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बंद झालेल्या या गावांना जाण्यासाठी जुन्या उरण ते शेवा मार्गाची माजी आमदार मनोहर भोईर व सामाजिक कार्यकर्ते महादेव घरत यांनी स्वखर्चाने तात्पुरती दुरुस्ती स्वखर्चाने केली होती. मात्र या मार्गाने प्रवासी वाहनां बरोबरच डम्पर सारख्या जड वाहनांची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे या मार्गाला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाळ्यात भर पडल्याने दीड ते दोन फुटांचे चिखलाने भरलेले धोकादायक खड्डे मार्गातून येथील नागरिक प्रवास करावा लागत होता. मात्र या मार्गाची दुरुस्ती करण्यात आल्याने प्रवास दिलासा मिळणार आहे.