पनवेल : काही दिवस वायू प्रदूषण करणाऱ्या शितगृहांना बंद ठेवल्यानंतरसुद्धा खारघर, कळंबोली परिसरात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. ठराविक काळात उग्रदर्प येत असल्याने खारघरचे रहिवाशी रात्रीपहारा ठेऊन नेमका दर्प कुठून येतो या शोधात तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जात आहेत. मात्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजमाप यंत्रामध्ये गुणवत्तेचा तक्ता दर्शविणारी आकडेवारी दिसत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रात्रदौरे केल्यानंतरसुद्धा मोजमापाची आकडेवारी दिसत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हे यंत्र तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेसहाशेहून अधिक कारखाने सुरु आहेत. खारघर वसाहतीचे निर्माण नंतर झाले, मात्र त्यापूर्वी या परिसरात औद्योगिक कारखाने होते. मात्र वसाहतींचे निर्माण करणाऱ्या सिडको महामंडळाने औद्योगिक वसाहतीभोवतालच्या ५०० मीटर अंतरावर ना रहिवास क्षेत्र (बफर झोन) आरक्षित करुन तेथे हरित पट्टे उभारणे गरजेचे होते. परंतु सध्या औद्योगिक वसाहत आणि रहिवास क्षेत्र हे काही मीटरवर येऊन ठेपले आहेत.
हेही वाचा – नवी मुंबई : पामबीच मार्गावरील पथदिवे बंद, वेगवान वाहनांमुळे अपघाताचा धोका
खारघर, तळोजा, नावडे आणि कळंबोली या परिसरात आजही वायू प्रदूषण होत असल्याने रहिवाशांना उग्रदर्प घेऊन घरात रहावे लागते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे प्रदूषण रोखण्यासाठी मागील काही दिवस औद्योगिक क्षेत्रातील निवडक शितगृहांवर रात्रीची बंदी घातली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुन्हा रात्रीचा दर्प सुरु झाल्याने खारघर तळोजा वेलफेअर असोशिएनचे पदाधिकारी मंगेश रानवडे व इतर यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील काही शितगृहांच्या परिसराला रात्रीची भेट दिली. याचवेळी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हवेतील वायू गुणवत्ता दर्शविणाऱ्या मोजमाप यंत्रावर हवेतील गुणवत्तेची माहिती घेतली, मात्र या मोजमाप यंत्रातून माहिती मिळत नसल्याची तक्रार रानवडे यांनी केली आहे.
हेही वाचा – उरण परिसरात सुक्या मासळीच्या दरांत वाढ
हवेतील वायू गुणवत्ता निर्देशांक मोजमाप यंत्राचे कामकाज हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली सुरु आहे. सध्या नवीन तांत्रिक प्रोग्रामचे अपडेटचे काम सुरु आहे. आम्ही त्याबद्दल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत सन्मवय साधला आहे. – विक्रांत भालेराव, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ