नवी मुंबई : राज्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या सिडको महामंडळाचे अध्यक्षपद अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने या महामंडळाच्या संचालकांमध्ये सरकारी लोकसेवक वगळता नागरिकांची बाजू मांडणारे एकही प्रतिनिधी नसल्याने सरकारीबाबूंच्या आणि राज्यकर्त्यांच्या हाती सिडको मंडळ कठपुतळी बनले आहे. ६ ऑगस्टच्या सिडकोच्या संचालक मंडळाच्या गुप्त बैठकीमध्ये ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्योगपतीला देण्यासाठी झालेल्या ठरावाबाबत ‘लोकसत्ता’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केल्यावर नवी मुंबईतील विविध राजकीय पक्षांनी त्या वृत्ताची दखल घेतली.

या वृत्तानंतर सिडकोच्या उच्चपदस्थांना लेखी निवेदन देऊन तसेच अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन हा लाडक्या उद्योगपतीसाठी घेण्यात आलेला ठराव रद्द करा, अन्यथा प्रकल्पग्रस्त सिडकोवर १० दिवसांत धडकतील असा आक्रमक पवित्रा राजकीय पक्षांनी घेतला. सामाजिक संघटनेने सुद्धा सिडकोच्या गुप्त कारभार पद्धतीवर ताशेरे ओढत लाडक्या उद्योगपतीसाठी घेतलेल्या ठरावाविरोधात संताप व्यक्त केला आहे. राजकीय व सामाजिक संस्थांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर सिडकोचे संचालक मंडळ या ठरावाबाबत कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. दिवसभर सिडकोत तो ‘लाडका उद्याोगपती’ कोण याचीच चर्चा होती.

हेही वाचा >>> वाढवण बंदर देशातील सर्वोत्तम बंदर बनणार; केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

ऐरोली येथील सेक्टर १० ए येथील ३० हेक्टर जमीनी क्षेत्र देशातील बड्या उद्योजकाला दिल्यानंतर सिडकोला त्याबदल्यात १० वर्षानंतर संपूर्ण प्रकल्पाच्या १० टक्के महसूल मिळणार आहे. या तत्वाने सिडको संचालक मंडळाच्या ६ ऑगस्टच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. एका खासगी सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाचे सादरीकरण केल्यानंतर संचालक सदस्यांनी अन्य सल्लागार कंपन्यांकडून सल्ला घेण्याचे म्हटले. संबंधित प्रस्तावाला तत्वता मंजुरी दिल्याचे सिडकोच्या कामगार संघटनेला समजल्यामुळे प्रथम या ठरावाला सिडकोच्या कामगार संघटनेने लेखी विरोध केल्याची माहिती कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन कांबळे यांनी दिली.

तसेच आमदार गणेश नाईक यांनी याबाबत गुरुवारी सिडको मंडळाला लेखी निवेदन दिले. हे नेमके काय प्रकरण आहे. उद्योगपतीला टाऊनशीप बांधण्यासाठी संबंधित ३० हेक्टर मोक्याची जमीन नेमकी कोणत्या धोरणाने देत आहे त्याची खरच गरज आहे का, अशी विचारणा नाईक केली आहे.

तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सिडकोने हा ठराव रद्द न केल्यास महाराष्ट्र युवक कॉंग्रेस पक्ष आंदोलन उभारेल, असे अनिकेत म्हात्रे असेही म्हणाले.

Story img Loader