पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पाणी संकटाला तोंड देत टॅकरच्या पाण्यावर उद्योग चालवून उद्योजक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिका-यांनी उद्योजकांना येत्या १५ दिवसांत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. परंतू हजारो कामगारांना रोजगार देणा-या तळोजा औद्योगिक वसाहतीला तातडीने पाणी पुरवठा न केल्यास उद्योग बंद पडतील या भितीने पनवेलच्या स्थानिक शिवसेनेच्या नेतृत्वाने थेट राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. उद्योगमंत्र्यांनी या पाणी संकटावर लकरच अधिका-यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले आहे.
निम्मा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा तळोजातील उद्योगांना सूरु असल्याने वैतागलेल्या उद्योजकांनी सोमवारी औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यालय गाठले. त्यानंतर मंगळवारी एमआयडीसीच्या स्थानिक अधिका-यांनी वरिष्ठ अधिकारी आणि टीएमएच्या (उद्योजकांची संघटना) शिष्टमंडळासोबत बैठकीचे आयोजन केले. टीएमएच्या सभागृहात झालेल्या बैठकीत एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता भुषण हर्षे, कार्यकारी अभियंता एस.पी. आव्हाड, उप अभियंता ए.टी. गाढडे यांच्यासह दीपक फर्टीलायझर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापक आणि टीएमएच्या उपाध्यक्ष जयश्री काटकर, टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे, सचिव राजेंद्र पानसरे, खजिनदार दिलीप परुळेकर, अमुल दूध उत्पादन करणारा समुहाचे प्रतिनिधी तसेच पाण्याचा सर्वाधिक वापर करणा-या कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पनवेल : पाण्याविना उद्योग कसे चालवायचे…
टीएमएच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी पाण्याशिवाय उद्योग कसे चालवावे, असा प्रश्न एमआयडीसी अधिका-यांसमोर मांडला. प्रति टॅंकर दोन हजार रुपयांचा दर १० हजार लीटर पाणी खरेदी करण्यासाठी लागत असून त्यावर उत्पादन घेणे शक्य नसल्याने एमआयडीसीने वेळीच पाणी पुरवठा न केल्यास उद्योगांमधील उत्पादन थांबेल, अशी भिती उद्योजकांनी व्यक्त केली. यावेळी एमआयडीसीच्या अधिका-यांना दीपक समुहाच्या के. १ या कंपनीला १४ एमएलडीची आवश्यकता असताना ११ एमएलडी पाणी पुरवठा, के. ७ व ८ या भूखंडावरील कंपनीला प्रत्येकी ४ आणि १८ एमएलडी पाणी हवे असताना प्रत्येकी तीन ते साडेतीन आणि १४ एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>> नवी मुंबई : पाऊस सुरूही झाला नाही, विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे सुरू
दीपक समुहाच्या नव्या प्रकल्पाला प्रत्येकी सात आणि २५ एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना प्रत्येकी पाच आणि १९ एमएलडी पाणी मिळत असल्याचे सांगण्यात आले. तसेच अमुल या कंपनीला १.२ एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना पाऊन एमएलडी पाणी मिळत असल्याची व्यथा उद्योगांच्या प्रतिनिधींनी मांडली. या दरम्यान ६२ दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असणा-या एमआयडीसीला अवघे ३८ एमएलडी पाणी मिळत असल्याची ही गंभीर बाब पनवेलचे शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिले. यावर उद्योगमंत्री सामंत यांनी लवकरच या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन शिवसेनेच्या सोमण यांना दिले.