नव्या इमारतीत केवळ बाह्य़रुग्ण विभाग; दहा हजार जणांसाठी केवळ ८१ खाटा

कोपरखैरणेत माथाडी कामगारांसाठी उभारलेल्या पाच मजली रुग्णालयात सध्या कामगारांना योग्य औषधोपचार मिळणे कठीण होऊन बसले आहे. या रुग्णालयाच्या नवीन इमारतीत बाह्य़ रुग्ण विभाग सुरू आहे. त्यामुळे इतर महत्त्वाच्या उपचारांसाठी जुन्या इमारतीत धाव घ्यावी लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी हे रुग्णालय बांधण्यात आले; मात्र त्याची ओळख नाममात्र राहिली आहे. हजारो माथाडी कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात रांगा लावाव्या लागत आहेत. नवी मुंबई आणि पनवेलमधून येणारे दहा हजार माथाडी कामगार कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करीत आहेत. रोजच्या अंग मेहनतीमुळे कामगारांना आजारपण आल्यास नव्या इमारतीत उपचार मिळणे कठीण होऊन बसले आहे. कामगारांसाठी प्रशासनाने एकाही खाटेची व्यवस्था करून दिलेली नाही. याबाबत माथाडी कामगारांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी नवी मुंबई हैराण झाली असताना माथाडी कामगारांसाठीच्या रुग्णालयात मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची संख्या होती. या वेळी रुग्णालयात पुरेशा सुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या, असे कोपरखैरणे येथील माथाडी कामगाराने या वेळी सांगितले.

  • माथाडी कामगारांवरील प्राथमिक उपचारांसाठी पनवेल, कळंबोली आणि वाशी येथे सुविधा केंद्रे
  • मोठय़ा उपचारांसाठी कामगारांना कोपरखैरणेत सोय.
  • जुन्या रुग्णालयात अवघ्या ८१ खाटांची सोय.
  • रुग्णालयात ४७ सल्लागार वैद्यकी अधिकारी, ३२ नियमित डॉक्टर आणि २७५ कर्मचारी

 

Story img Loader