चाळीस वर्षांपूर्वी उरण व अलिबाग या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या करंजा-रेवस खाडी पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाची आता मंजुरी मिळाली असून २०२५ पर्यंत तो पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेवस व करंजा ही दोन्ही बंदरे रस्ते मार्गाने जोडली जाणार आहेत. या पुलाचे स्वप्न साकार होत असल्याने उरण व अलिबागमधील दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण चे करंजा बंदर हे दोन किलोमीटरचे खाडीचे अंतर असून या खाडीवर पूल उभारण्याचा प्रस्ताव १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी केला होता. मात्र त्याची मागील चाळीस वर्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. या करीता उरण मध्ये करंजा रेवस प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन इमारती उभारल्या होत्या त्याही जीर्ण झाल्याने धोकादायक बनल्या असल्याने वापरा साठी बंदी घालण्यात आली आहे. या पुलाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याची निविदा ही प्रसिद्ध झाली असून २०२५ पर्यंत हा पूल पूर्ण होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून धोकादायक जलप्रवासावर अवलंबून असलेल्या उरण व अलिबाग या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना रस्ते मार्गाने प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: शालेय विदयार्थ्यांनी केली आदिवासी मुलांची दिवाळी गोड
पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार
या रेवस व करंजा या दोन्ही बंदराना जोडणाऱ्या पुलामुळे अलिबाग, मुरुड तसेच कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग असा वळसा न घालता थेट नवी मुंबईतून उरणच्या करंजा येथून अलिबाग गाठता येणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी लागणार वेळ, इंधन आणि जादाचे पैसेही वाचण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवासही वेगाने होणार आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: ३० वर्षांपासून रखडलेला नाल्यावरील पुल अखेर मार्गी लागणार
रेवस करंजा रो रो च काय होणार ?
रेवस करंजा खाडी पूल मंजूर झाला आहे. तर याच मार्गावरील रेवस करंजा या जलमार्गावर रो रो ची तयारी सुरू असून यातील करंजा रो रो जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. तर रेवस जेट्टीचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यातच या मार्गावरील ही सेवा सुरू होणार असल्याने खाडी पूल तयार झाल्यानंतर रो रो सेवेचे काय होणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.