नागरिकांच्या तीव्र भावना; सिडको वसाहतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाबाबतही नाराजी

वाशी

(प्रभाग क्रमांक ५३, ५४, ५८, ५९ आणि ६०)

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : वाशी उपनगरात पुनर्विकास या महत्त्वाच्या प्रश्नाबरोबर प्रभाग ५३, ५४ आणि ५९ या परिसरातील नाला बंदिस्ती करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दुर्गंधीमुळे श्वास कोंढला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. सिडकोकालीन वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित असल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे. इतर उपनगरांप्रमाणे वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर आहे. वाशी सेक्टर १६ येथे नाला बंदिस्त करून त्यावर वाहनतळ उभारण्याची मागणीही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

वाशी विभागात ५३, ५४, ५८, ५९, ६०,६१,६२,६३ ६४, आणि ६५ या दहा प्रभागांचा समवेश होतो. या प्रभागात प्रभाग ५९ हा जुहूगाव असून प्रभाग ६५ हा वाशी गाव आहे. वाशी विभागात कोपरी गाव असले तरी ते प्रभाग रचनेत तुर्भे विभागात आहे. वाशी हा सर्वात शांत विभाग समजला जातो. नवी मुंबईत सर्वाधिक व्यावसायिक इमारती याच भागात असून वाशी सेक्टर १७ ‘बिझनेस हब’ म्हणून ओळखला जातो.

यातील प्रभाग ५३, ५४, ५८, ५९ आणि ६० मध्ये पालिकेतर्फे मूलभूत सुविधा पुरवल्या जात असल्या तरी नागरी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात मोठी समस्या आहे, सिडकोकालीन घरांची. निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे ही बांधकामे धोकादायक झाली असून यात अनेक गृहनिर्माण संस्था आहेत. अवघ्या चार ते पाच वर्षांतच घरघर लागली आहे. यातील काहींना सिडकोने अन्यत्र हलवले आहे, मात्र अजूनही अनेक धोकादायक घरांत लोक राहात आहेत. दुसरी मोठी समस्या आहे ती नाला दुर्गंधी. प्रभाग ५३,५४ आणि ५९ या प्रभागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये याबाबत संताप आहे.

प्रभागनिहाय समस्या

स्मशानभूमीचे हस्तांतरण रखडले

प्रभाग ५३ मध्ये सेक्टर १२ व  जुहू गावचा काही भाग येतो. एकीकडे उच्चभ्रू लोकवस्ती आणि दुसरीकडे गावठाण अशी रचना आहे. येथील स्मशानभूमी आजही सिडकोच्या ताब्यात आहे. तिचे पालिकेकडे हस्तांतरण न झाल्याने देखभाल दुरुस्ती होत नसल्याने दुरवस्था झाली आहे. या पंचवार्षिकमध्ये काम करण्यात आले, मात्र याबाबत नागरिक समाधानी नाहीत. वाढती मलनि:सारण वाहिनीला अनेक ठिकाणी वारंवार गळती असते. तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचा त्रास होत असून डासांचा प्रादुर्भावही वाढत आहे.

नाला बंदिस्ती कधी?

प्रभाग ५४ मध्ये सेक्टर २८,२९ आणि १४ चा काही भाग येतो. या प्रभागातील अनेक वर्षांपासून रखडलेली समस्या म्हणजे नाला दुर्गंधी. अँकरवाला स्कूल ते ब्ल्यू डायमंड हॉटेलपर्यंत हा नाला या प्रभागात येतो. या ठिकाणी कोपरी सिग्नल ते ब्ल्यू डायमंड हा वर्षांनुवर्षे रखडलेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे, मात्र काम संथगतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नागरी कामांबाबत समाधान व्यक्त होत असले तर पार्किंगची समस्या गंभीर आहे.

उड्डाणपुलाची मागणी

प्रभाग ५८ मध्ये सेक्टर १५ व सेक्टर १४ चा काही भाग येतो. या प्रभागात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या आहे. सतरा प्लाझा ते सेक्टर १४ दरम्यान ही कोंडी कायम होत असते. त्यावर तोडगा काढण्याची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाची मागणी होत आहे. या प्रभागात उभारण्यात आलेली बहुउद्देशीय इमारत उद्घाटनाअभावी बंद आहे. अँकरवाला शाळेनजीक नव्याने उद्यान विकसित करण्यात आले आहे. पदपथ, रस्ते व अन्य पायाभूत सुविधांची कामे झाली आहेत.

रस्त्यावर मासे विक्री

प्रभाग ५९ मध्ये जुहूगाव येते. या ठिकाणी वर्षांनुवर्षे त्याच समस्या आहेत. यात गावठाण असल्याने बेकायदा बांधकामे झाल्याने रस्ते निमुळते झाले आहेत. या ठिकाणच्या लॉजमुळे रहिवाशांना अनेक सामाजिक समस्यांना सामोर जावे लागत आहे. बेकायदा वाहन दुरुस्ती दुकानं, पान टपऱ्या मोठय़ा प्रमाणात आहेत. मासळी विक्री थेट रस्त्यावर होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

फेरीवाल्यांचा त्रास

प्रभाग ६० मध्ये सेक्टर ९, ९ ए, १० ए आणि सेक्टर २ चा समावेश होतो. सिडको कालीन धोकादायक इमारती ही या प्रभागातील मोठी समस्या आहे. गेल्या २० वर्षांपासून पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे. धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन रहिवासी राहत आहेत. सुमारे ६४० सदनिका धारकांच्या घराचे स्वप्न रखडले आहे. दुसरी मोठी समस्या आहे ती बेकायदा फेरीवाले. नवी मुंबईत सर्वाधिक फेरीवाल्यांची गंभीर ससम्या याच प्रभागात आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेक्टर ९ येथील फेरीवाले हटवून वाशी बस स्थानकाशेजारील बंदिस्त नाल्यावर ३९ फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले होते. मात्र त्यांची संख्या आता ४०० च्या घरात पोहचली आहे. या पंचवार्षिकमध्ये येथील मिनी चौपाटीवरील जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली असून अन्य पायाभूत सुविधांची पूर्तताही करण्यात आली आहे.

विद्यमान नगरसेवक

* प्रभाग ५३ : प्रज्ञा भोईर (भाजपा)

* प्रभाग ५४ :  शशिकांत राऊत (भाजपा)

* प्रभाग ५८ : प्रकाश मोरे (भाजपा)

* प्रभाग ५९ : हरिश्चंद्र भोईर (शिवसेना)

* प्रभाग ६० : अविनाश लाड (कॉंग्रेस)

* प्रभाग ६१ :  किशोर पाटकर (शिवसेना)

* प्रभाग ६२ :  अंजली वाळुंज (कॉंग्रेस)

* प्रभाग ६३ :  दमयंती शेवाळे (भाजपा)

* प्रभाग ६४ :  दिव्या गायकवाड (भाजपा)

* प्रभाग ६५ : फशीबाई भगत (भाजपा)

सहापैकी चार भाजप नगरसेवक

प्रभाग ५३, ५४, ५८ आणि ५९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. मात्र गणेश नाईक भाजपत गेल्यानंतर येथील नगरसेवकही भाजपवासी झाले आहेत. प्रभाग ६० हा काँग्रेसकडे तर प्रभाग ५९ शिवसेनेकडे आहे. यातील प्रभाग ५३ हा सर्वसाधारण झाल्याने चुरस वाढली आहे. तर सर्वसाधारण असलेला प्रभाग ५४ हा मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाला आहे. या विभागातील प्रभाग ५८ हा नाईकांसाठी प्रतिष्ठेचा आहे. संजीव नाईक, ज्ञानेश्वर नाईक याच प्रभागातून निवडून आले होते. सध्या या ठिकाणी प्रकाश मोरे नगरसेवक असून त्यांच्या पत्नी इच्छुक आहेत. प्रभाग ५९ हा मागासवर्गासाठी आरक्षित होता यावेळी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. तर प्रभाग ६० मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण आहे.

सायंकाळी स्वत:च्या वाहनातून घरापर्यंत पोहचणे अवघड होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असतात. त्यात फेरीवाले रस्त्यावर बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहन पास होणे कठीण होत आहे.

-राजेंद्र दीक्षित, रहिवासी सेक्टर ९ वाशी

धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. रहिवाशांना हक्काचे पक्की घरे मिळतीलच या शिवाय पार्किंगची मोठी समस्या दूर होईल. वाहने उभी करण्यासाठी जागा मिळेल.

– विकास सहस्रबुद्धे

वाशी पालिका रुग्णालयासमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ठोस उपाय शोधणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियोजन करणे गरजचे आहे. किती दिवस ही वाहतूक कोंडी सहन करायची.

– अनिता माने

सेक्टर १० ची ‘कोंडी’ कधी फुटणार?

या प्रभागात वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न असून सेक्टर १० येथे सर्वाधिक कोंडी होत असते. या ठिकाणी पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय असल्याने मोठी वर्दळ असते. मात्र रुग्णालयासमोरील रस्ता केवळ १५ फुटांचाच आहे. रुग्णालयाशेजारी चर्च आणि शाळा व एक महाविद्यालय आहे. त्यामुळे दिवसभर मोठी वर्दळ या ठिकाणी असते. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक लोक त्रस्त आहेत. यातून कधी सुटका होणार असा सवाल होत आहे.

Story img Loader