रायगड जिल्ह्यातील भात पीक स्पर्धेत तालुक्यातील चिरनेरच्या श्री. महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष, कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांना सेंद्रिय पद्धतीचा वापर करून एका गुंठ्यांत ९१ किलो भाताच्या पिकाचे उत्पादन केले आहे. कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय राज्य भात पीक स्पर्धेत सलग दोन वर्षे उरण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तर याच स्पर्धेत २०२३ मध्ये रायगड जिल्ह्यात पाचव्या क्रमांकाने विजयी ठरले आहेत.
या भात पीक स्पर्धेसाठी एक गुंठ्याचे क्षेत्र निवडण्यात आले होते. खारपाटील यांनी सेंद्रिय खताचा व चारसूत्री पद्धतीची लागवड करून, एक गुंठ्याच्या क्षेत्रातून ९१ किलोग्राम एवढे भात पिकाचे उत्पादन काढले. जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृषी उपसंचालक काळभोर, तहसीलदार विजय तळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळाजी ताटे, तसेच कृषी क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – “शेतकऱ्यांनी आधुनिकतेचा स्विकार करावा”; शरद पवारांचा सल्ला
औद्योगिक व नागरीकरणामुळे शेती नष्ट होणारा तालुका
६० वर्षांत उरणमधील पिकत्या शेतीवर औद्योगिकीकरण आणि नागरीकरणासाठी येथील शेतीवर बुलडोझर फिरविला जात आहे. त्यामुळे उरणमधील शेतकरी हे भूमिहीन होऊ लागले आहेत. त्याचवेळी शेतीत वेगवेगळ्या प्रयोगातून उत्पादन घेतले जात आहेत.
हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांकरिता नवी मुंबई महापालिकेचा ‘वेस्ट टू बेस्ट’ उपक्रम
शेती टिकविण्याची गरज
उरणमध्ये दर सहा महिन्यांनी एक प्रकल्प घोषित केला जात आहे. त्यामुळे, उरणमधील पिकती शेती टिकविण्याची गरज निर्माण झाली आहे.