नवी मुंबई : प्रवाशांची चार तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे त्याला परत मिळाली.
सोमवारी कोपरखैरणे येथे राहणाऱ्या अनिता भानुशाली आणि भाविका भानुशाली या डोंबिवलीला जाण्यासाठी निघाल्या. सामान जास्त असल्याने दोघींनी कोपरखैराणेतील रांजणदेवी रिक्षा थांब्यावरून दोन रिक्षा पकडून कोपरखैरणे रेल्वे स्थानक येथे उतरल्या. डोंबिवलीचे तिकीट काढून दोघी लोकलची वाट पाहात फलाटावर थांबल्या असता भाविकाकडे बॅग नसल्याचे अनिता यांच्या लक्षात आले. आपली पिशवी रिक्षात विसरली असल्याने त्यांनी वाहतूक पोलीस बीटला जात साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कोंद्रे यांना माहिती दिली.
रिक्षाच्या टपावर मयुरी आणि सपना हे नाव लिहिले असल्याची ओळख दिली. पोलिसांनी खानदेश रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यांनीही असे नाव लिहिलेली रिक्षा शोधून काढून रिक्षाचालक प्रशांत पवार याच्याशी संपर्क साधला.
पवार यांनी आपल्या रिक्षात पिशवी राहिली असून ती पोलीस ठाण्यात जमा करणार असल्याची माहिती दिली. मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे, वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कोंद्रे, सचिन देसले तसेच खानदेश रिक्षाचालक-मालक संघटनेचे जगदीश पाटील, रिक्षाचालक प्रशांत पवार यांच्या उपस्थिती ती दागिणे असलेली पिशवी भानुशाली कुंटुंबीयांकडे सुपूर्द केली.