जगदीश तांडेल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का व उरणच्या करंजा आणि अलिबागच्या रेवस या उरणला जोडणाऱ्या शंभर कोटींच्या दोन्ही जलमार्गावरील रो- रो जलसेवेचे काम रखडले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून या मार्गावरील काम अपूर्णच आहे. यामध्ये मोरा जेट्टीचे ७५ कोटींची तर करंजा-रेवसचे २५ कोटींचे काम आहे. या मार्गावरील कामाच्या दिरंगाईमुळे खर्चातही वाढ होऊ लागली आहे.

मोरा जेट्टीचे काम मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. मात्र असे असले तरी लवकरच या रो- रो च्या कामाला सुरुवात करून २०२५ च्या निश्चित वेळी मार्ग सुरू होईल असा दावा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.२०१८ ला मंजूर झालेल्या मोरा (उरण) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानच्या रो रो सेवेचे काम निधीअभावी रखडले आहे. मागील सहा महिन्यांपासून या जेट्टीवर एकही दगड पडलेला नाही. मात्र जेट्टीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहीती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांना पनवेलमधील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे नसल्यास आम्हाला निर्णायक लढा देण्याची वेळ आली; माजी आ. बाळाराम पाटील

उरणमधील नागरिकांसाठी आपल्या खासगी वाहनांसह मुंबईत ये-जा करता यावी याकरिता मोरा ते मुंबई रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या जलसेवेच्या कामाला सुरुवात झाली आहे.या जलमार्गाचे काम अनेक वर्षे रखडल्याने या कामाचा अंदाजित ५० कोटींचा खर्च वाढून ७५ कोटींवर पोहचला आहे.

मोरा पोलीस ठाणे नजीक जेट्टीचे काम सुरू असून दगडांचा भराव करून जेट्टी बांधण्यात येत आहे. उरणवरून मुंबईत ये-जा करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या रो रो जेट्टीच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे ही सेवा कधी सुरू होणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.रो रो सेवेचे काम बंद झाले नसून जेट्टीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला बिल न दिल्याने तसेच मध्यंतरी दगडखाण बंदीमुळे काम थांबले होते.उरण व अलिबाग या दोन तालुक्यांदरम्यान दोन किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोट्या बोटीचा (तरीचा) वापर केला जात आहे.

ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली. त्यानुसार २५ कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो रोची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर, कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>पनवेल औद्योगिक वसाहतीचा वनवास संपणार; एमआयडीसीने पायाभूत सुविधांच्या प्रस्तावित कामांना मंजूरी दिली

प्रवासी संख्येत वाढ

उरणमधील वाढते उद्याोग आणि नवी मुंबईच्या जवळ असणारे शहर म्हणून तसेच उरण मधून नव्याने लोकल सुरू झाली आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय व शिक्षण यानिमित्ताने उरण ते अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेवस जेट्टीवर वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे.

उरणअलिबागमधील अंतर कमी होणार

या रो रो सेवेमुळे उरण व अलिबागच्या प्रवाशी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील ५० किलोमीटरपेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे.

वाहनासह जलप्रवासाचा उत्तम पर्याय

उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानच्या रो रो जलप्रवासात उरणच्या नागरिकांना आपलं चार व दुचाकी वाहन घेऊन मुंबईत जाता येणार आहे. त्यामुळे वाहनासह उत्तम प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ro ro water services on waterways connecting mora to bhaucha dhakka in mumbai and karanja in uran and revus in alibaug have been suspended amy