रोडपाली जंक्शन ते कळंबोली सर्कल मृत्यूचा ‘पूर्वापार’ सापळा; उपाययोजनांबाबत सरकारी पातळीवर उदासीनता
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या ९५ किलीमीटर अंतरावर गेल्या पाच वर्षांत ६०० जणांचा बळी गेला आहे. रविवारी पनवेलजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. प्रशासनाला धाऱ्यावर धरत स्थितीत सुधारणा करण्याचे आदेश दिले. पनवेलपासून काही अंतरावर असलेल्या रोडपाली जंक्शन ते कळंबोली सर्कल या अवघ्या दीड किलोमीटरच्या पल्ल्यात गेल्या पाच वर्षांत ३०७ अपघातांमध्ये १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांची पोलिसांत नोंद होऊनही या मृत्यूमार्गाची ‘चिंता’ कोणीही वाहिलेली नाही. त्यामुळे या पट्टय़ात अपघात मालिकेत अद्याप खंड पडलेला नाही.
पनवेलहून मुंबईला जाण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी महामार्ग क्रमांक ४ म्हणजेच पनवेलहून मुंब्रा व त्यानंतर ठाणे व मुंबई असाच प्रवास करावा लागत होता. कालांतराने दळणवळण साधनांमध्ये विकास होऊन काँक्रिटीकरणाचा सहा पदरी दुहेरी मार्ग बनविण्यात आला; परंतु उरण बंदर, डोंबिवली, गुजरात, नाशिक आणि भिवंडी येथे जाणाऱ्या पनवेल-मुंब्रा मार्गाकडे रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्षच झाले आहे.
शिळफाटा ते कळंबोली सर्कल या महामार्गावर आजही पथदिवे नाहीत. आयआरबी कंपनी या मार्गासाठी टोलवसूली करते. तरीही या मार्गाची स्थिती अत्यंत भयावह आहे.
त्यात कळंबोली सर्कल ते रोडपाली जंक्शन या दीड किलोमीटरचा अरुंद मार्ग आणि मार्गावरील असुरक्षितेतेमुळे यमाचा पाहुणा होण्यास वेळ लागत नाही, अशी अवस्था या मार्गाच्या लगतहून चालणाऱ्या पादचाऱ्यांची झाली आहे.
शिळफाटा ते कळंबोली सर्कल या मार्गाचे रूंदीकरण आणि सेवारस्ता यात नव्याने उड्डाणपूल बांधले जाणार असल्याच्या अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. विशेष म्हणजे याबाबत प्रशासनातील अधिकारी वा निर्णय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना या अपघातांत बळी गेलेल्यांची चिंता नाही.
आघाडी सरकारच्या काळात शेवटच्या सहा महिन्यांमध्ये राज्यभरात विविध विकासकामांमध्ये मंत्रिमंडळाने जे निर्णय घेतले ते निर्णय रद्द करण्याची घोषणा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात शिळफाटा ते कळंबोली सर्कल या मार्गामधील काही विकासकामे करण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावाला चालना मिळाली नाही. काही महिन्यांनी याच मार्गाचा पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला असून संबंधित १० विविध कामांच्या निवीदा जाहीर करण्यात आल्या आहेत, असे पुणे येथील एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
उपाययोजना हव्यात
- पथदिवे असावेत
- मार्ग सहापदरी असावा त्याचे तात्पुरते रूंदीकरण करावे
- अवजड वाहने बेकायदा उभी केली जातात त्यावर नियंत्रण नाही
- मार्ग दुभाजक असावा, दुभाजकात अंतर असावे
- कळंबोली सिग्नल येथे २४ तास पोलीस नेमावेत