जेएनपीटी ते जासई या राष्ट्रीय महामार्गावर जासई ते करळ उड्डाणपूल या सहा किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील रस्त्यावर अंधार पसरला आहे. त्यामुळे या मार्गाने होणाऱ्या एस.टी. आणि एन.एम.एम.टी. सार्वजनिक वाहनातील प्रवासी वाहतुकीला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा- परदेशी मलावी हापूसचे एपीएमसीत आगमन; महिनाभर आफ्रिकन हापूसची चव चाखायला मिळणार
उरणमधील सार्वजनिक वाहतूक ही याच मार्गाने होत आहे. जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या विस्तरलेल्या मार्गामुळे वाहतुकीचा वेग वाढला आहे. या वेगवान वाहनांचा रस्त्यावरून सुखकर प्रवास व्हावा याकरीता रस्ताच्या दोन्ही बाजूने पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक दिवे हे वारंवार बंद असतात. तर मार्गावरील अनेक ठिकाणचे दिवे बंदच असतात. अशाच प्रकारच्या प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या करळ उड्डाणपूल ते जासई या मार्गावरील दिवे बंद आहेत.त्यामुळे या मार्गावर अंधार पसरला आहे.यातील करळ पुलावरील काही भागातील पथदिवे सुरू आहेत तर काही दिवे बंद आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई ते अलिबाग अंतर केवळ सव्वा तासात, बेलापूर ते मांढवा वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरू
वहाळ तरघर मार्गावर दिवसाही दिवे सुरूच
जेएनपीटी ते नवी मुंबईतील बेलापूर या मार्गावरील वहाळ ते तरघर या मार्गावरील दिवे शनिवारी दिवसाही सुरू होते. त्यामुळे एकीकडे अंधार तर दुसरीकडे भरदिवसा दिवे असा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा सावळागोंधळ सुरू आहे.