वाणिज्य संकुल भाडेपट्टय़ाने देण्याचा पालिकेचा निर्णय

ठाणे-बेलापूर मार्गावर दिघा येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन रखडले आहे. बाधित झालेल्या ६४ गाळेधारकांपैकी मूळ १६ गाळेधारकांना गाळे देण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यात काही निवासी तर काही वाणिज्य गाळेधारकांचा समावेश आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या काळात सर्वसाधरण सभेत दिघा येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा ठराव मांडण्यात आला होता. पुनर्वसनासाठी ६४ गाळे बांधण्यात आले होते, मात्र फक्त १६ मूळ गाळेधारकांचे पुनर्वसन होणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. अन्य गाळे हे नंतरच्या काळात बांधण्यात आल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यास प्रशासनाने नकार दिला होता. नगरसेविका अपर्णा गवते यांनी सर्व गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी सर्वसाधरण सभेत आक्रमकपणे केली, मात्र प्रशासनाने ही मागणी झिडकारत फक्त १६ गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यावर शिक्कामोर्तब केले. उर्वरित रहिवासी संकुल हे पालिका कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर दिले असून वाणिज्य गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथे रस्ता रुंदीकरणाचे काम पुनर्वसनामुळे अनेक वर्षांपासून रखडले होते. यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या रस्त्यांमध्ये बाधित होणाऱ्यांसाठी महानगरपालिकेने एमआयडीसीकडून हस्तांतरित झालेल्या रामनगर येथील भूखंडावर २०१४ मध्ये १४ कोटी रुपये खर्च करून ६४ गाळे बांधले होते. गाळे बांधून झाल्यांनतर देखील त्यांचे पुनर्वसन रखडले होते. पण तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्यांना गाळे हटविण्याचा इशारा दिला. तर गाळेधारकांनी देखील आयुक्तांच्या आदेशानंतर गाळे जमीनदोस्त केले.

या गाळेधारकांसाठी महानगरपालिकेने ६४ गाळे बांधून ठेवले होते. ११ वाणिज्य, ३ निवासी बांधकामे असून दोघांना दोन्हीपैकी एकाचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेने उभारलेल्या इमारतीमध्ये ३० वर्षांसाठी वार्षिक एक रुपया दराने लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स तत्त्वावर गाळे व घरे देण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद केले होते. नगरसेवक नवीन गवते यांनीही ज्यांच्याकडे ग्रामपंचायत काळापासूनचे पुरावे आहेत, त्यांनाही अपात्र ठरवल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. परंतु रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्यांचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन केले जात असल्याचे माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित राहिला. तर बाधित गाळेधारकांनी उर्वरित जागेवर पुन्हा अतिक्रमण करत दुकाने थाटली आहेत. नगरसेविका अपर्णा गवते यांनी बाधित झालेल्या गाळेधारकांना घरे देण्याची मागणी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने ६४ वाणिज्य व रहिवासी संकुले बांधली आहेत.  रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी १६ गाळे देण्यात येणार आहेत. गाळे व रहिवासी संकुल वगळता उर्वरित गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. रहिवासी संकुल हे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी देण्यात आले आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा

ओएस-१ भूखंडावर रस्त्यामध्ये बाधित झालेल्यांसाठी गाळे बांधून पूर्ण आहेत, मात्र अद्याप त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. महाराष्ट्र शासनाने समृद्धी  महामार्ग व नवी मुंबई विमानतळ येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले त्याच धर्तीवर रस्त्यामुळे बाधित झालेल्यांचे करण्यात, यावे अशी मागणी निवेदनाद्वारे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे.

अपर्णा गवते, नगरसेविका

Story img Loader