पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवारी (ता.१४) खारघर येथील सेक्टर ३५ येथील मैदानावर होत असून पंतप्रधान खारघर उपनगरात येत असल्याने पंतप्रधानांचे हेलिपॅड ते सभा स्थळापर्यंत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. पंतप्रधानाच्या आगमनामुळे खारघरमधील सेक्टर ३५ व इतर परिसरात सरकारतर्फे खड्डेमुक्त रस्ते, इतर रंगरंगोटी केली जात असल्याने नागरिकांकडून पंतप्रधान मोदी यांच्या सभा महिन्यातून एकदा तरी झाल्या पाहिजेत, अशी मागणी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळ्यापूर्वीपासून खारघरच्या रहिवाशांची खड्डे मुक्त रस्त्यांची मुख्य मागणी आहे. पंतप्रधान गुरुवारी खारघरमध्ये येत असल्याने आपसूक ही मागणी पूर्ण होत आहे. भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे. उरण, पनवेल, कर्जतसह नवी मुंबईतील अनेक विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना या सभेसाठी आणण्याचे नियोजन भाजपने केले आहे. सुमारे २५ हजार कार्यकर्ते सभे ठिकाणी गुरुवारी सायंकाळी जमून पंतप्रधान मोदी यांचे विचार ऐकणार आहेत. या सभेचा सर्वाधिक लाभ पनवेलचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना होणार आहे.

हेही वाचा – कमळ केंद्रित प्रचारावर भर, बेलापूर मतदारसंघात भाजपची खेळी; प्रचार आखणीतही मोठे बदल

हेही वाचा – आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी १२०० हून अधिक पोलीस बळ सभेठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली तैनात केले जाणार आहे. खारघरबाहेरुन शेकडो वाहने खारघरमध्ये दाखल होणार असल्याने अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत पोलिसांनी बदल सुचविले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनामुळे खारघरच्या काही परिसराचे सुशोभिकरण काही तासांमध्ये सरकारी यंत्रणा करत असल्याने पंतप्रधानांच्या सभा खारघरमध्ये वारंवार घेण्यात याव्यात, अशी प्रतिक्रिया नागिरकांकडून व्यक्त केली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads kharghar prime minister narendra modi meeting ssb