नवी मुंबईतील दिवाळे गावात १८ लाखांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. किल्ली ही कपाटालाच राहीली असल्याने चोरांनी सहज चोरी केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.
नवी मुंबईतील दिवाळे गावात प्रोग्रेसिव्ह आर्केड नावाची सोसायटी असून सदर सोसायटी उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखली जाते. मात्र या ठिकाणी कुठलाही सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला नसून सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले नाहीत. हे सर्व हेरून चोरट्यांनी तिसऱ्या मजल्यावर रहाणाऱ्या गुरदयाल सिंह या ७२ वर्षीय इसमाच्या घरात चोरी केली. तिसऱ्या मजल्यावरील दोन्ही सदनिका एकत्र करत प्रशस्त घरात गुरदयाल हे पत्नी आणि एका मुलीसह राहतात. रविवारी दिवाळी निमित्त ते आपल्या खारघर येथे मुलाकडे गेले होते.ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे लँच तोडून घरात प्रवेश केला.
हेही वाचा >>>पनवेल: भाजपची माजी नगरसेविकेच्या पतीविरोधात कारवाई
घरातील ज्या कपाटात किमती ऐवज व रोकड ठेवली होती त्याच कपाटाच्या हँडलला कपाटाची किल्ली होती. चोरट्यांनी या किल्लीचा वापर करून आतमध्ये असलेल्या २ हजार रुपये चलनाच्या ३० नोटा, ५०० रुपयांच्या ८० नोटा तसंच ५५ तोळे ९ ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने, १९५ ग्रॅम वजनाचे जुन्या पद्धतीचे पण वापरात असलेले चांदीचे दागिने असा १८ लाख ४० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. रविवारी आपल्या मुलाकडे गेल्या नंतर गुरदयाल सिंह हे मंगळवारी रात्री साडे अकाराच्या सुमारास जेव्हा घरी आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या बाबत सागरी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्चीहा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.